जळगाव : प्रतिनिधी
वर्षभरासाठी जिल्ह्यातून हद्दपार असलेला जुनेद शेख उर्फ बवाली (वय- २६) हा कमरेला सुरा लावून दहशत माजवित असतांना त्याच्या एमआयडीसी पोलिसांनी मुसक्या आवळल्या. त्याच्याकडून सूरा हस्तगत करण्यात आला असून त्याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील मेहरुण परिसरात अक्षय तृतीयेनिमित्त बारागाड्यांचा उत्सव असल्याने एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, सफौ अतुल वंजारी, हेमंत कळसकर, पोना किशोर पाटील, सचिन पाटील, योगेश बारी, पोकॉ राहुल रगडे हे शनिवारी सायंकाळच्या सुमारास बंदोबस्त करीत होते. यावेळी पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना वर्षभरासाठी जिल्ह्यातून हद्दपार केलेला सराईत गुन्हेगार जुनेद शेख उर्फ बवाली युनूस शेख रा. तांबापूर हा कमरेला सूरा लावून दहशत माजवित असल्याच माहिती मिळाली.
त्यांनी तात्काळ गुन्हे शोध पथकातील कर्मचार्यांचे पथक तयार करुन कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार पथकाने मेहरण परिसरात सापळा रचून मेहरुण परिसरातील महादेव परिसरात रवाना केले. यावेळी यूनूस उर्फ बवाली शेख हा त्याठिकाणी फिरत होता. पथकाने त्याला हद्दपार असल्याने जिल्ह्यात येण्यासंबंधित उपविभागीय अधिकार्यांची परवानगी असल्याची विचारणा केली. परंतु त्याच्याकडे कुल्याही प्रकारची परवानगी नव्हती. दरम्यान, पोलिसांनी त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्या कमरेला लोखंडी धारदार सूरा मिळून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत सुरा जप्त केला. त्याला पोलीस ठाण्यात आणून त्याच्याविरुद्ध उपविभागीय दंडाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन तसेच आर्म अॅक्ट पमाणे पोलीस कर्मचार्याच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.