जळगाव : प्रतिनिधी
शहरातील दांडेकर नगर येथे एकाच इमारतीमध्ये राहणारे सुमेधपंडीत माधव नेतकर या शिक्षकासह भुषण सुधाकर उंबरकर यांचे भरदिवसा बंद घर फोडून चोरट्यांनी १ लाख २३ हजार रूपये किंमतीचे सोने-चांदीचे दागिने लांबविल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलिसात अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
दांडेकर नगरामधील कार्तिक पार्क येथील इमारतीच्या पहिल्या मजल्यावर शिक्षक सुमेधपंडित नेतकर हे पत्नी ज्योती व मुलासह वास्तव्यास आहेत. शुक्रवारी नेतकर कुटूंब घराला कुलूप लावून खासगी कामानिमित्त बाहेर गेले होते. दुपारी १.५० वाजेच्या सुमारास ज्योती नेतकर या घरी आल्या. तेव्हा त्यांना घराच्या दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसले. घरात प्रवेश केल्यानंतर सामान अस्ताव्यस्त फेकलेला पहायला मिळाला. ज्योती यांनी लागलीच पती सुमेधपंडित यांना फोन करून घरी बोलवून घेतले. त्यानंतर घरात पाहणी केल्यावर ८० हजार रूपये किंमतीची सोन्याची पोत, २० हजार रूपये किंमतीची सोन्याचे मंगळसूत्र, २० हजार रूपये किंमतीची सोन्याची अंगठी आणि ५०० रूपये किंमतीची चांदीची चेन असा एकूण १ लाख २० हजार रूपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबविल्याचे समोर आले. नेतकर कुटूंब राहत असलेल्या इमारतीच्या तिस-या मजल्यावर भुषण सुधाकर उंबरकर हे वास्तव्यास असून त्यांचे सुध्दा बंद घर चोरट्यांनी फोडून १ हजार रूपये किंमतीचे सोन्याचे पदक, २ हजार रूपये किंमतीची चांदीची गोप व मोठी वाटी असा एकूण ३ हजार रूपयांचा ऐवज चोरून नेल्याचेही समोर आले. त्यानंतर नेतकर यांनी रामानंदनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.