नवी दिल्ली : वृत्तसंस्था
छत्तीसगडच्या बालोद जिल्ह्यात तब्बल २० वर्षांपूर्वी झालेल्या हत्येचा खुलासा झाला आहे. पोलिसांनी खोदकाम करून मानवी अवशेष बाहेर काढले आहेत. एक व्यक्ती पोलिसांकडे आला आणि त्याने २००३ मध्ये एका मित्राची हत्या केली होती, त्याची आत्मा मला सतावतेय असा दावा केला तेव्हा पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी केली. आरोपीने दाखवलेल्या ठिकाणी खोदकाम केले तेव्हा तिथे मानवी अवशेष आढळले. त्यानंतर आता गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी टीकम कोलियार आणि छवेश्वर गोयल यांच्यात मैत्री होती. हे दोघेही त्याकाळी १८ वर्षाचे होते. टीकमचे एका मुलीसोबत प्रेमसंबंध सुरू होते. जी आज त्याची पत्नी आहे. प्रेयसी अश्विनी कोलियार हिच्यावर मित्र छवेश्वर वाईट नजरेने पाहायचा. छवेश्वर नेहमी तिची छेड काढायचा. ही बाब युवतीने प्रियकराला सांगितली. त्यानंतर त्याने मित्राला समजवायचा प्रयत्न केला. मात्र एकेदिवशी छवेश्वरने हद्दच पार केली. त्याने अश्विनीसोबत बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. जेव्हा ही बाब प्रियकराला माहिती पडली तेव्हा त्याचा राग अनावर झाला. त्याने छवेश्वरला बेदम मारले. त्यात त्याचा मृत्यू झाला.
छवेश्वरच्या मृत्यूनंतर गावापासून ३०० मीटर अंतरावर जलाशयाशेजारी त्याचा मृतदेह गाडण्यात आला. छवेश्वर बेपत्ता झाल्याने त्याच्या घरच्यांना चिंता लागली. त्याने सगळीकडे त्याचा शोध घेतला परंतु हाती काहीच लागले नाही. २००३ मध्ये छवेश्वरच्या बेपत्ता होण्याची तक्रार पोलिसांकडे नोंदवण्यात आली होती. परंतु पोलिसही त्याचा शोध घेऊ शकले नाहीत. तर दुसरीकडे आरोपीने प्रेयसीसोबत लग्न केले. लग्नानंतर त्याने पत्नीलाही मित्राची हत्या केल्याचे सांगितले नाही.
टीकम आणि त्याच्या पत्नीला या काळात २ मुले झाली. घटनेनंतर काही वर्षांनी आरोपी चिंताग्रस्त झाला. मित्राची आत्मा त्याला सतावतेय असा दावा त्याने केला. २०२१ मध्ये त्याने गावच्या लोकांना आणि पत्नीला मित्राची हत्या करून मृतदेह जमिनीत पुरल्याचे सांगितले. त्याने हा गुन्हा पोलिसांसमोरही कबूल केला. आरोपीने सांगितलेल्या ठिकाणी पोलिसांनी खोदकाम केले. तेव्हा मृतदेह सापडला नाही त्यावेळी गावकरी आणि पोलिसांनी टिकमची मानसिक अवस्था ठीक नसल्याचे मानले. मित्राची आत्मा स्वप्नात येतेय, तो मला दिवसरात्र दिसतो. त्याची आत्मा मला त्रास देतेय असं टिकम सांगत राहिला. याकाळात छवेश्वरच्या कुटुंबांनी पोलिसांवर दबाव टाकून घटनेची चौकशी करण्याची मागणी केली.
पोलिसांनी टिकम आणि गावकऱ्यांसह पुन्हा एकदा सांगितलेल्या ठिकाणी खोदकाम सुरू केले. १९ एप्रिल रोजी जेसीबीने घटनास्थळी खोदकाम केले तेव्हा तिथे मानवी अवशेष सापडले. ७ हाडे, कपडे, १ रुपयाचा सिक्का जप्त करण्यात आला. हे सर्व सामान फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आले. ही हाडे माणसाची आहे की जनावरची याची पुष्टी करण्यासाठी लॅबला पाठवले. त्यानंतर याचा रिपोर्ट आल्यानंतर डिएनए चाचणी करून पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचे पोलीस म्हणाले.