चाळीसगाव : प्रतिनिधी
चाळीसगाव पोलिसांकडून कोंबींग ऑपरेशन दरम्यान खुनाच्या गुन्हातील आरोपी असलेल्या भोदुबाबास अटक करण्यात आली. सदर आरोपीने खूनाची कबुली दिली असून त्याला चाळीसगाव पोलिसांकडून जायखेडा पोलीस स्टेशनकडे हस्तांतरीत करण्यात आलेले आल्याची माहिती मिळाली आहे.
सविस्तर वृत्त असे की, दिनांक १९/०४/२०२३ ते दिनांक २०/०४/२०२३ दरम्यान पोलीस अधिक्षक सो. जळगांव यांच्या आदेशान्वये तसेच अपर पोलीस अधीक्षक, रमेश चोपडे व सहाय्यक पोलीस अधीक्षक अभयसिंह देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीत कोंबिंग ऑपरेशन व नाकाबंदीचे आयोजन करण्यात आले होते.
कोंबिंग ऑपरेशन दरम्यान पोलीस निरिक्षक संदीप पाटील तसेच गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सुहास आव्हाड, पोना.राहुल सोनवणे, भूषण पाटील, पोकॉ. विजय पाटील, रवींद्र बच्चे, निलेश पाटील, अमोल भोसले, आशुतोष सोनवणे, समाधान पाटील, शरद पाटील असे पोलीस स्टेशन हद्दीत गस्त करीत असताना, चाळीसगाव शहरातील दत्तवाडी परिसरात फॉरेस्ट विभागाच्या भिंती लगत एक संशयित इसम त्याचे स्वतःचे अस्तित्व लपवून गुन्हा करण्याच्या तयारीत असताना, तुळशीराम बुधा सोनवणे (वय ३२ वर्ष ) रा. पिंपळकोठे ता. बागलाण जि. नाशिक मिळुन आला.
त्याची पंचासमक्ष झडती घेतली असता, त्याच्याकडे एक दोन फूट लांबीची लोखंडी सळई मिळून आल्याने त्याच्याविरुध्द चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन गुरनं.१५६/२०२३ महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १२२ प्रमाणे गुन्हा दाखल करुन त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता, त्याने माहिती दिली कि, त्याचा दुरचा नातेवाईक प्रविण सोनवणे रा. पिंपळकोठे ता. बागलाण जि. नाशिक याचे त्याच्या बायकोशी अनैतिक संबंध होते. प्रविण सोनवणे हा नेहमी अघोरी विद्या शिकण्याचे बहाण्याने आरोपी तुळशीराम सोनवणे याचेकडे येत जात होता. तसेच आरोपी तुळशिराम यास प्रविण सोनवणे गुरु सुध्दा मानत होता. प्रविण सोनवणे याने तुळशिराम याच्या बायकोशी अनैतिक संबंध ठेवल्याने त्याचा राग मनात धरुन प्रविण सोनवणे यास राहते घरी बोलावुन त्याचे मित्राचे मदतीने गळफास देवुन प्रविण सोनवणे यास जिवे ठार मारले. तो मेल्याची खात्री झाल्यावर प्रविणचा मृतदेह घरीच सोडुन पळ काढला. प्रविण सोनवणे हा घरी न आल्याने त्याचे नातेवाईकांनी जायखेडा पो.स्टे. जि. नाशिक येते तक्रार नोंदवली होती.
प्रविणचा शोध घेत असतांना त्याचा मृतदेह तुळशिराम सोनवणे याच्या राहते घरात मिळुन आल्याने अकस्मात मृत्युची नोंद करुन तेथील पोलीस हे आरोपी तुळशीराम सोनवणेचा शोध घेत होते. आरोपी तुळशीराम सोनवणे हा आलियाबाद गावात मांत्रीक म्हणुन प्रसिध्द असुन सदर आरोपी मिळुन आल्याचे सदर गुन्ह्याची उकल करणे चाळीसगांव शहर पोलीसांना शक्य झालेले आहे. सदर भोंदुबाबा तुळशीराम सोनवणे यास अटक करुन जायखेडा पोलीस स्टेशनकडे हस्तांतरीत करण्यात आलेले आहे. तसेच नमूद आरोपीचा अभिलेख चेक केला असता, त्याच्यावर यापूर्वी जायखेडा पोलीस स्टेशन जि. नाशिक येथे गुरनं.७२/२०१४ भादवि कलम ३२६ वगैरे प्रमाणे गुन्हा दाखल आहे.