नवी दिल्ली : वृत्तसंस्था
जम्मू-कश्मीरमध्ये पुन्हा दहशतवादी हल्ल्या झाल्याने हादरलं आहे. राष्ट्रीय रायफल्सच्या जवानांना घेऊन जाणाऱ्या ट्रकवर दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला. त्यामुळं ट्रकला भीषण आग लागली. त्यातील पाच जवान शहीद झाले, तर एक जवान जखमी झाला. पूंछ जिल्ह्यात भीमबर गली ते संगिओतकडं दुपारी तीनच्या सुमारास हा हल्ला झाला. दरम्यान, लष्करानं युद्धपातळीवर सर्च ऑपरेशन सुरू केलंय.
याचदरम्यान, भारतीय लष्करानं शहीद जवानांची नावं जाहीर केली आहेत. दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पाच जवानांमध्ये हवालदार मनदीप सिंग, लान्स नाईक देबाशिष बसवाल, लान्स नाईक कुलवंत सिंग, शिपाई हरकृष्ण सिंग आणि शिपाई सेवक सिंग यांचा समावेश आहे. हे सैनिक राष्ट्रीय रायफल युनिटमध्ये तैनात होते आणि दहशतवादविरोधी ऑपरेशनमध्ये कार्यरत होते.
@Whiteknight_IA salutes the sacrifice of Hav Mandeep Singh, L/Nk Debashish Baswal, L/Nk Kulwant Singh, Sep Harkrishan Singh, Sep Sewak Singh, who laid down their lives in the line of duty in #Poonch Sector on 20 Apr 23. We stand in solidarity with the bereaved families. pic.twitter.com/50D9HRdssa
— White Knight Corps (@Whiteknight_IA) April 20, 2023
राजौरी सेक्टरमध्ये दहशतवाद्यांनी जवानांच्या वाहनावर हल्ला केल्यावर ही घटना घडली. या हल्ल्यात पाच जवान शहीद झाले, तर एक जखमी झाला. हल्ल्यानंतर दहशतवाद्यांना पकडण्यासाठी ऑपरेशन सुरू करण्यात आलं, मात्र हल्लेखोरांचा तपशील अद्याप सापडलेला नाही. लष्करानं सांगितलं की, मुसळधार पावसामुळं कमी दृश्यमानतेचा फायदा घेत अज्ञात हल्लेखोरांनी हा हल्ला केला. दहशतवाद्यांच्या संभाव्य ग्रेनेड हल्ल्यामुळं लष्कराच्या ट्रकला आग लागली. रिपोर्टनुसार, या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी जैशच्या PAFF नं घेतली आहे. PAFF चे प्रवक्ते तन्वीर अहमद राथर यांनी एका निवेदनात हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. जम्मू-काश्मीरमधील जी-20 बैठकीला लक्ष्य केलं जाईल, अशी धमकीही त्यांनी दिलीये.