जळगाव : प्रतिनिधी
बी टू सी स्मार्ट एक्सप्रेस कुरिअर सर्व्हीस कंपनीच्या लिंकवर फॉर्म भरायला सांगत स्पर्धा परिक्षेची तयारी करणार्या तरुणीला 1 लाख 24 हजारात गंडविल्याची घटना शहरातील जुन्या एमआयडीसीतील परिसरात घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तरुणीने ऑनलाइन साडी बुक केली होती पण ती घरी पोहचली नसल्याने फॉर्म भरल्यानंतर तिची फसवणूक झाली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील जूनी एमआयडीसी परिसरातील एम.एस.ई. बी कॉलनीत स्वाती तायडे ही तरूणी वास्व्यास असून ती स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहे. दि. 1 एप्रिल रोजी तिने ऑनलाइन साडी बुक केली होती. ऑनलाईन बुक केलेली साडी दि. 3 एप्रिल रोजी तरुणीला बी टू सी स्मार्ट एक्सप्रेस कुरिअर सर्व्हीस कंपनीद्वारे मिळणार होती. परंतु दि. 7 एप्रिल तारीख येऊनही साडी मिळाली नाही. त्यामुळे तरूणीने कुरिअर कंपनीच्या संकेतस्थळावर साडीच्या डिलिव्हरी स्टेटस् चेक केले. त्यावेळी तिला डिलेव्हरी पेडींग दिसून आली म्हणून कुरिअर कंपनीच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधला. त्यावेळी त्या व्यक्तीने तरूणीला तुमचा पत्ता सापडत नसल्यामुळे पार्सल पेडींग दिसत असल्याचे सांगून कंपनीच्या लिंकवर जाऊन एक फॉर्म भरण्यास सांगितला. त्यानुसार तरूणीने कंपनीच्या लिंकवर जावून संपूर्ण फॉर्म भरला.
तरुणीने फॉर्म भरल्यानंतर काही मिनिटानंतर तरूणीला तिच्या खात्यातून पैसे कपात झाल्याचा मॅसेज आला. तरुणीच्या क्रेडीट कार्ड आणि बँक खात्यातून पैसे कपातीचा मेसेज आल्यानंतर तरूणीला शंका निर्माण झाली. तरूणीने खात्यातील रक्कम तपासल्यानंतर रक्कम कमी झालेली दिसून आल्याने तीला धक्काच बसला. खात्यातील रक्कम तपासल्यानंतर तब्बल 1 लाख 24 हजार रूपये खात्यातून कपात झाल्याचे दिसून आल्यावर बुधवारी तिने एमआयडीसी पोलीसात दिलेल्या तक्रारीवरून सायबर ठगाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.