जळगाव : प्रतिनिधी
घरात लग्नाची धामधूम सुरू, त्यात लग्नाच्या पत्रिका छापून आता लग्नघटिकेची वाट पाहत असलेल्या तरुणावर अमळनेर उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकाऱ्यांनी दोन वर्षांसाठी हद्दपारीचे कारवाईचे आदेश काढले आहेत. संबंधित युवकावर आधी असलेल्या विविध गुन्ह्यांबाबत पोलिसांकडून आलेल्या विनंतीनुसार ही कारवाई करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चोपडा येथील साने गुरुजी वसाहत या भागातील रहिवासी असलेल्या आकाश भोई असे कारवाई झालेल्या युवकाचे नाव आहे. आकाशचे ३ मे रोजी चोपडा येथे लग्न आहे. त्यासाठी जय्यत तयारी सुरु असतानाच, त्याच्या आधी मात्र, लग्नाच्या काही दिवसांआधीच आकाशवर हद्दपारीची कारवाई करण्यात आल्याने, लग्नाच्या बेडीत अडकण्यापूर्वीच आकाशवर हद्दपारीची ‘हथकडी’ घालण्याची वेळ आली आहे.
आकाशवर याआधी चोपडा पोलिस ठाण्यात विविध घटनांमध्ये गुन्हे दाखल आहेत. पोलिसांकडून याबाबत चौकशी केल्यानंतर अनेकवेळा या आरोपीला हजर राहण्याचे आदेश २६ दिले मात्र संबंधित युवक हजर राहिला नाही. त्यात आगामी सण-उत्सव पाहता व या युवकावर आधी असलेल्या गुन्ह्यांचे स्वरुप पाहता युवकाला धुळे, नंदुरबार व जळगाव या तीन जिल्ह्यांमधून हद्दपार करण्याची मागणी पोलिसांकडून करण्यात आली होती. पोलिसांच्या अहवालाची माहिती घेतल्यानंतर अमळनेर प्रांताधिकारी सीमा अहिरे यांनी आकाश भोई याला चोपडा, नंदुरबार, जळगाव, यावल, शिरपूर, अमळनेर, धरणगाव या तालुक्यांमधून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्याचे आदेश काढण्यात आले आहेत.