पुणे : वृत्तसंस्था
कोकण, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भासह राज्यातील सर्वच भागात पावसाने हजेरी लावल्याने फळबागा आणि अन्य शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाने धिंगाणा घातला असून शेतकऱ्यांची झोप उडवली आहे. सिंधुदुर्ग आणि मराठवाडय़ातील काही गावांत गारांचा वर्षाव झाला. दरम्यान, 10 एप्रिलपर्यंत पावसाळी वातावरण राहणार असल्याचे हवामान खात्याने सांगितल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
शुक्रवारी रात्रीपासून राज्यातील बहुतांश भागांत अवकाळी पावसाने हजेरी लावली. शनिवारीही काही भागांत पावसाचा जोर होता. सिंधुदुर्ग जिह्यातील कुडाळ, सावंतवाडी, वेंगुर्ला तालुक्यात ठिकठिकाणी पाऊस कोसळला. कुडाळ तालुक्यातील काही भागांत सोसाटय़ाच्या वाऱ्यासह गारांचा वर्षाव झाला. यामुळे रब्बी हंगामातील आंबा, काजू, कोकम, सुपारी आदी फळबागांचे मोठे नुकसान झाले.
विदर्भात बुलढाणा, अकोला, वाशीम, अमरावतीपर्यंत पावसाने हजेरी लावली. मराठवाडय़ाला खेटून असलेल्या बुलढाणा, जळगाव, नगर जिह्यांनाही अवकाळीने जबर तडाखा दिला. एप्रिलमध्ये पावसाळी वातावरण बघण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे अनेक शेतकऱयांनी सांगितले. या पावसाने उरल्यासुरल्या पिकांचीही नासाडी केली. पपई, खरबूज, टरबूज, आंबा, संत्री, कांदा पिकांचा अक्षरशः चिखल झाला.
बेमोसमी पावसामुळे या वर्षी देशातील गहू उत्पादनात 10 ते 20 लाख टनांची घट होण्याची शक्यता फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या सूत्रांनी व्यक्त केली. मात्र केंद्रीय अन्न मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव सुबोधसिंह यांनी अवकाळी पावसाने 10 ते 20 लाख टन गव्हाचे उत्पादन घटण्याची शक्यता वर्तवली आहे. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील रामगड येथील तलावाच्या भिंतीजवळ वीज कोसळल्याने नऊ बकऱ्या ठार झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी घडली आहे. यात सुदैवाने गुराखी बचावला आहे. या घटनेत गुलाबसिंग बिलाले यांच्या 5 शेळय़ा, तारासिंग बिलाले यांच्या 3 शेळय़ा, लटु बिलाले यांची 1 अशा एकूण 9 शेळय़ा मृत्युमुखी पडल्या आहेत.
राज्यात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला आणि विजाही कोसळल्या. त्यात आठ जणांचा मृत्यू झाला. सिल्लोड तालुक्यात वीज कोसळून एकाचा मृत्यू झाला. औंढा नागनाथ तालुक्यात बोरजा येथेही एक वीजबळी गेला. परभणी जिल्ह्यात मानवत तालुक्यात मांडेवडगाव येथे वीज पडून महिलेचा मृत्यू झाला. बुलढाणा तसेच अमरावती जिल्ह्यात वीज पडून तीन, तर भिंत कोसळून एका मुलीचा मृत्यू झाला. कोल्हापुरातही वीज पडून एकाचा मृत्यू झाला. गेल्या तीन दिवसांपासून सटाणा, मालेगाव तालुक्याला अवकाळीसह गारपिटीचा फटका बसत आहे. यामुळे कांदा, डाळिंब, द्राक्षबागांसह शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी हवालदिल झाला आहे. वादळी वाऱ्यामुळे कांदा शेड, घरांवरील पत्रे उडाल्याने अनेकांचे संसार उघडय़ावर पडले आहेत. दरम्यान, गारेगाव येथे सोसाटय़ाच्या वाऱ्यामुळे काही घरांचे पत्रे उडाल्याने नुकसान झाले आहे, अशी माहिती मालेगावचे तहसीलदार नितीन देवरे यांनी दिली.