नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशात गेल्या तीन ते चार वर्षापासून वेगवेगळ्या कारणाने चित्रपट सृष्टीतील दिग्गज अभिनेत्यांनी आपली जीवनयात्रा संपविल्याच्या घटना समोर आल्यानंतर आज पुन्हा एका अभिनेत्रीने वाराणसीच्या हॉटेलमध्ये गळफास घेत जीवनयात्रा संपविली आहे.
मिळालेली माहिती अशी कि, रविवारी वाराणसीतील एका हॉटेलात अभिनेत्री आकांक्षा दुबेने आत्महत्या केली. शुक्रवारी रात्री शूटिंग संपवून आकांक्षा हॉटेलमध्ये गेली. तिथे गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली. ही बाब रविवारी उजेडात आली. तिने हे पाऊल का उचलले हे समजू शकले नाही. आकांक्षाचा जन्म 21 ऑक्टोबर 1997 रोजी उत्तर प्रदेशातील मिर्झापूर येथे झाला. तिला बालपणापासूनच नृत्य व अभिनयाची आवड होती. ती सोशल मीडियावर नेहमीच आपल्या डान्सचे व्हिडिओ पोस्ट करत असे. आकांक्षा भोजपुरी सीनेसृष्टीतील एक प्रसिद्ध चेहरा होती.
आकांक्षाने ‘वीरों के वीर’ व ‘कसम पैदा करने वाले की 2′ नामक चित्रपटांत काम केले होते. आज 26 मार्च रोजीच तिचे भोजपुरी सुपरस्टार पवन सिंहसोबतचे एक नवे गाणे रिलीज झाले आहे. आरा कभी हारा नहीं’ असे या गाण्याचे नाव आहे. हे गाणे न पाहताच आकांक्षाने आत्महत्या केली. यामुळे भोजपुरी इंडस्ट्रीमध्ये दुःखाची लाट पसरली आहे. आकांक्षा दुबे सारख्या गुणी अभिनेत्रीने अचानक आपली जीवनयात्रा संपवल्यामुळे मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.