पुणे : वृत्तसंस्था
राज्यात बारावीची परीक्षा सुरु असतानाच एक मोठी घटना घडली होती. बारावीचा गणिताचा पेपर फुटल्याप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. साखरखेर्डा पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली असून यात दोन शिक्षकांचा समावेश आहे. पेपर सुरु होण्याचा अर्धा तासापूर्वी गणिताचा पेपर सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यानंतर राज्यभरात एकच खळबळ उडाला होती. याप्रकरणात दोन शिक्षकांसह आजुबाजुच्या गावातल्या तीन तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यांच्यावर कलम 420 आणि 120 ब अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. मात्र पेपर फुटी प्रकरणात अद्यापही मुख्य सूत्रधार पोलिसांना सापडला नाही.
राज्यात अर्थसंकल्प अधिवेशन सुरु असल्याने पेपर फुटीच्या मुद्दावरून विरोधकांनी सत्ताधारी शिंदे आणि फडणवीस सरकारला धारेवर धरलं. यावेळी दोषींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली. विधीमंडळातील गोंधळानंतर सरकारने याप्रकरणी कडक कारवाई आदेश दिले. त्यानंतर गटशिक्षणाधिकारी रंगनाथ गावडे यांनी पेपरफुटी प्रकरणी सिंदखेडराजा पोलिसांकडे तक्रार दाखल केली. गेल्या काही दिवसांपासून बारावीच्या पेपर फुटीमुळे ही परीक्षा आहे की शिक्षणाचा खेळखंडोबा असा प्रश्न जनतेला पडला आहे. या प्रकरणानंतर बुलढाण्यातील 4 परीक्षा केंद्रांचे संचालक तडकाफडकी बदण्यात आले आहेत.
शिक्षण मंडळाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे की, पुन्हा गणिताचा पेपर घेतला जाणार नाही. गणिताचा पेपर फुटली ही पहिली घटना नाही. परभणीत इंग्रजीचा पेपर फुटला होता. शिक्षण विभागाच्या या गलथान कारभामुळे हौतकरु विद्यार्थी आणि पालकांमध्ये नाराजी आहे. एका पाठोपाठ दोन पेपर फुटल्यामुळे राज्यातील शिक्षण विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. बारावीची परीक्षा सुरु आहे की गंमत असा प्रश्न अनेकांना पडला आहे.