अमळनेर : प्रतिनिधी
तालुक्यातील पातोंडा परिसर विकास मंच या संस्थेला सहकार महर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात पुरस्काराने गौरविण्यात आले असून सर्वत्र मंचावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. दिनाक २४ रोजी आकाशवाणी सभागृह पुणे येथे पुरस्कार समारंभ कार्यक्रमात हरित मित्र परिवार व गुरुकृपा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने सदरचा पुरस्कार सुनील फुलारी (इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस कोल्हापूर परिक्षेत्र) यशवंत मानखेडकर (डेप्युटी डायरेक्टर नेहरू युवा केंद्र भारत सरकार, मुंबई) डॉ. सुनीता सिंह (प्रधान मुख्य वनसंरक्षक सामाजिक वनीकरण महाराष्ट्र राज्य) इंद्रजित बागल ( कार्यक्रम प्रमुख दूरदर्शन व आकाशवाणी) विवेक खांडेकर ( अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक सामाजिक वनीकरण महाराष्ट्र राज्य) महेन्द्र घागरे (अध्यक्ष हरित मित्र परिवार) प्रशांत थोरात (कार्यवाह गुरु कृपा संस्था पुणे) यांच्या हस्ते विकास मंच मार्गदर्शक रावसाहेब बोरसे व सदस्य भूषण बोरसे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी पुणेरी पगडीने पातोंडा परिसर विकास मंचच्या सदस्यांच्या सन्मान करण्यात आला.
मानपत्र, स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. या कार्यक्रमाचे दूरदर्शन व आकाशवाणी वरून थेट प्रक्षेपण करण्यात आले होते. हा पुरस्कार पर्यावरण संवर्धन, वृक्षलागवड, वृक्ष, पाणी, माती जतन व संवर्धन भरीव कामगिरीबद्दल दिला जातो..यंदाचा पुरस्कार उत्तर महाराष्ट्रातील पातोंडा परिसर विकास मंच या संस्थेला मिळाल्याबद्दल संस्थेच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. पातोंडा परिसर विकास मंच ही संस्था २०१५ वर्षी स्थापन करण्यात आली आहे. कपिल पवार यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असून, कन्हेय्या थोरात, रावसाहेब बोरसे, मगन सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनात काम करते. संस्थेचे अध्यक्ष म्हणून प्रा. शिक्षक विलास चव्हाण व सचिव ग्रा.पं. सदस्य सोपान लोहार काम पाहतात. या वर्षी विकास मंच ही संस्था पर्यावरण वृक्ष लागवड, माती पाणी, जतन संवर्धन, नालाखोलीकरण, शिक्षण, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, सामाजिक, आरोग्य इत्यादी क्षेत्रात काम करत असून २०१५ पासून संस्थेला अनेक पुरस्कार व पारितोषिके मिळालेले असून यावर्षी महाराष्ट्र शासनाचा छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार नंतर सहकार महर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात पुरस्कार मिळाल्याने अजून एका पुरस्काराची भर पडली आहे. त्यामुळे संस्थेच्या सदस्यांमध्ये अजून उभारी मिळणार आहे.