औरंगाबाद : वृत्तसंस्था
नुकताच जगभरात ‘व्हॅलेंटाइन डे’ 14 फेब्रुवारी रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या दिवशी आपलं लग्न व्हावे, असे प्रत्येक प्रेमीयुगुलांना वाटत असते. दरम्यान यासाठी अनेक प्रेमीयुगुलांकडून मुद्रांक नोंदणी विभागात नोंदणी केली जाते. तर औरंगाबादच्या मुद्रांक नोंदणी विभागातील सहायक दुय्यम निबंधक कार्यालयात यावर्षी ‘व्हॅलेंटाइन डे’चे औचित्य साधून 7 जोडप्यांनी नोंदणी विवाह केला आहे. विशेष म्हणजे, या लग्नासाठी 150 रुपये प्रमाणे अवघ्या 1 हजार 50 रुपयांत सातही जोडप्यांच्या लग्नाचा बार उडाला. यावेळी नववधू-वरांचे नातेवाईक, मित्र परिवारांची उपस्थिती होती.
औरंगाबादच्या मुद्रांक नोंदणी विभागातील सहायक दुय्यम निबंधक कार्यालयात ‘व्हॅलेंटाइन डे’चे औचित्य साधून 7 जोडप्यांनी नोंदणी विवाह केला आहे. आनंदात एकमेकांना मिठाई भरवून नवदाम्पत्यांनी निबंधक कार्यालय आवारात विवाह सोहळा साजरा केला. सहायक दुय्यम निबंधक तथा जिल्हा विवाह नोंदणी अधिकारी एस.डी. कुलकर्णी यांनी सांगितले की, दिवसभरात 7 जोडप्यांनी नोंदणी पद्धतीने विवाह केला. नोंदणी विवाह करणाऱ्यांमध्ये शहरातील 5 तर तालुक्यातील दोन जोडप्यांचा समावेश होता.
एका विवाह नोंदणीसाठी 150 रुपये…
दरम्यान सहायक दुय्यम निबंधक कार्यालयात लग्न लावण्यासाठी 150 रुपये शुल्कात विवाहाची नोंदणी होते. त्यात नोटीस शुल्क 50 आणि नोंदणी 100 रुपयांचा समावेश आहे. दोघांचे आधारकार्ड झेरॉक्स प्रत, रहिवासी आणि वयाचा पुरावा लागतो, असे जिल्हा विवाह अधिकारी कुलकर्णी यांनी सांगितले. कोरोनामुळे गर्दीच्या निर्बंधामुळे नोंदणी विवाह करण्याकडे अनेकांचा कल वाढला आहे. 2020 आणि 2021 या दोन वर्षांत नोंदणी विवाह मोठ्या प्रमाणात झाले, असल्याचं देखील ते म्हणाले.
नोव्हेंबर- डिसेंबरमध्ये अर्ज आले होते
गेल्या चार वर्षांत 1805 नोंदणी विवाह झाले. यात 2019 मध्ये 495 तर 2020 मध्ये 319 विवाह झाले. 2020 च्या एप्रिल महिन्यात एकही नोंदणी विवाह झाला नाही. 2021 मध्ये 446 विवाह नोंदणी पद्धतीने झाले. 2022 मध्ये 569 च्या आसपास नोंदणी विवाह झाले. जानेवारी व फेब्रुवारी 2013 मध्ये 89 विवाह झाले. तर विवाह नोंदणीसाठी सह. दुय्यम निबंधकाकडे ऑनलाइन अर्ज करावा लागतो. त्यानंतर विवाहाची तारीख दिली जाते. ज्यात 30 ते 90 दिवसांच्या दरम्यान विवाहासाठी तारीख मिळते. तसेच आपला विवाह नोंदणी व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी करण्यासाठी नोव्हेंबर- डिसेंबरमध्ये अर्ज आले होते.