जळगाव : प्रतिनिधी
शहर महानगरपालिका ही ‘ड’ वर्गात समाविष्ठ असून सद्यस्थितीत तत्कालीन जळगाव नगरपरिषदेच्या मंजूर आकृतीबंध व सेवा प्रवेश नियमावली नुसार कामकाज करण्यात येत होते. तसेच जळगांव शहराची सातत्याने वाढणारी लोकसंख्या व त्यामुळे पायाभूत सुविधांवर पडणारा ताण, राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजनांची सक्षमपणे अंमलबजावणी करणे, लोक कल्याणकारी व पारदर्शी कामकाजाची नागरीकांकडून होणारी मागणी व त्या अनुषंगाने वाढलेले प्रशासकीय कामकाज लक्षात घेता जळगाव शहर महानगरपालिकेच्या आकृतिबंधास तातडीने मान्यता मिळणे आवश्यक होते.
जळगाव शहर महानगरपालिकेच्या नवीन आकृतिबंधाचा विषय अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. यासाठी आमदार राजुमामा भोळे यांचा शासन स्तरावर सतत पाठपुरावा सुरु ठेवला होता. अखेर आज १४ जळगाव शहरासाठी अत्यंत आनंदाची बातमी जळगाव शहराचे आमदार सुरेश राजुमामा यांनी शहरातील जनतेला दिली आहे.
जळगाव शहर महानगरपालिकेच्या नवीन आकृतीबंधास शासन स्तरावर मान्यता मिळालेली असून जळगाव शहर महानगरपालिकेत विविध पदांच्या भरतीकरिता एकूण ४५० जागांची भरती प्रक्रियेसाठी शासनाची मान्यता मिळालेली आहे. यासाठी मंत्री गिरीष महाजन आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले असून आमदार राजुमामा भोळे यांच्या प्रयत्नांना अखेर यश मिळाले आहे. तसेच मनपातील शिक्षणाची अट असलेल्या १२ रोजनदारी कर्मचाऱ्यांची सुद्धा सेवेत सामावून घेण्याबाबतच्या प्रस्तावास सुद्धा मंजुरी देण्यात आलेली आहे.
मनपाचा प्रलंबित अनुकंप भरतीचा मार्ग सुद्धा लवकरच पूर्ण होणार असून लेखापरीक्षण संदर्भात देखील लवकरच योग्य तो निर्णय देण्यात येणार असल्याची माहिती मंत्रालय नगर विकास खात्याकडून मिळाल्याचे आमदार राजुमामा यांनी कळविले आहे.
नवीन आकृतिबंध मंजुरी तसेच ४५० पदांच्या महत्वाच्या भरती प्रकियेमुळे जळगाव शहराच्या विकासाला गती येईल असा विश्वास दाखवत राजुमामा भोळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे आभार आमदार भोळे यांनी केले.