जळगाव : प्रतिनिधी
जळगाव शहरातील पिंप्राळा परीसातील गांधी चौकातील रहिवासी असलेला २० वर्षीय तरुण आईसोबत घरी येत असतांना धावत्या रेल्वेतून तोल जावून पडल्याने प्रणव विजय बारी (वय-२०) या तरुणाचा उपचार सुरु असतांना दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळच्या सुमारास घडली. आईच्या डोळ्यादेखत पोटाच्या गोळ्याचा मृत्यू झाल्याने त्याची आई मानसिक धक्का बसला आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत नातेवाईकांकडून मिळालेली माहिती अशी की, शहरातील पिंप्राळा परिसरातील गांधी चौकात प्रणव हा कुटुंबियांसोबत वास्तव्यास होता. सध्या तो पुण्यातील सिंहगड कॉलेजमध्ये शिक्षण घेत होता. काही दिवसांपुर्वी तो घरी आला असल्याने शुक्रवारी तो आईसोबत भुसावळ येथे मावशीकडे गेला होता. दोन दिवस मावशीकडे राहिल्यानंतर प्रवण व त्याची आई रविवारी सकाळी घरी येण्यासाठी भुसावळ येथून मेमू रेल्वेत बसला होता. भुसावळ स्टेशनावरुन गाडी सुटल्यानंतर प्रणव हा लघुशंकेसाठी गेला. रेल्वेने काही अंतरावर असलेल्या स्वामी समर्थ मंदीराजवळ प्रणवचा तोल गेल्याने तो धावत्या रेल्वेतून खाली पडला. हा प्रकार त्याच्या आईच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी आरडाओरड केली. रेल्वेची चैन ताणून रेल्वेथांबवून आईने धाव घेतली. तसेच घटनेची माहिती भुसावळ येथे राहणार्या बहिणीच्या मुलगा राकेश याला दिली. त्याने घटनास्थळी धाव घेवून जखमीवस्थेत प्रणव याला गोदावरी रूग्णालयात हलविले. याठिकाणी त्याच्यावर उपचार असतांना त्याची मृत्यूशी सुरु असलेली झुंज अपयशी ठरली.
धावत्या रेल्वेतून पडल्याने प्रणव हा गंभीर जखमी झाला होता. त्याच्या छातीला आणि पोटाला गंभीर दुखापत झाली होती. त्याच्यावर उपचार सुरु असतांना त्याची प्राणज्योत मालवली. आईच्या डोळ्या देखत तिच्या पोटच्या गोळ्याच्या दुर्देवी मृत्यू झाल्याने त्याच्या आईला प्रचंड मानसिक धक्का बसला असून बारी कुटुंबियांना अश्रू अनावर झाले होते.
वडील भाजीपाला विक्री करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात तर त्याची मोठी बहिण स्वामीनी ही पुण्यात नोकरी करते. त्यांची घरची परिस्थिती हालाखिची असल्याने प्रणवच्या शिक्षणाचा खर्च त्याची बहिणच करीत असल्याने तो पुण्यात आपल्या बहिणीसोबतच राहत होता. त्याच्या पश्चात आई, वडील, बहिण असा परिवार आहे. रेल्वेतून पडून प्रणवचा दुर्देवी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच त्याच्या नातेवाईकांसह मित्र मंडळींनी शासकीय रुग्णालयात धाव घेतली. सायंकाळी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविदयालयात शवविच्छेदन करण्यात आले. या घटनेबाबत नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.