नवी दिल्ली : वृत्तसंस्था
जेव्हा लहान मुळे रडतात तेव्हा पालक रडणाऱ्या मुलाला शांत करण्यासाठी त्याच्या हातात मोबाईल देतात. मात्र त्याचेही अनेक तोटे आहेत. काही वेळा मोबाईल मुलांच्या हाती दिल्यास त्याचा आर्थिक फटका पालकांना बसतोय. अशाच एका घटनेत एका मुलाने त्याच्या वडिलांचा मोबाईल घेतला आणि त्यावरुन तब्बल 80 हजार रुपयांच्या जेवणाची ऑर्डर दिली. इतकचं काय तर वरुन त्याने 25 टक्के टीपही दिली. अमेरिकेतील मिशिगनमध्ये राहणाऱ्या 6 वर्षांच्या मुलाला भूक लागली होती. त्यानंतर त्याने वडिलांच्या मोबाइलवरून 1000 डॉलर्स म्हणजे सुमारे 80 हजार रुपयाच्या जेवणाची ऑर्डर केले. या मुलाच्या वडिलाचे नाव कीथ स्टोनहाउस असून त्याने आपल्या मुलाला मोबाईल गेम खेळायला दिला होता, आणि तेवढ्यात या मुलाने हा ‘खेळ’ केला.
कीथ स्टोनहाऊसने सांगितले की, तो आपल्या मुलाला झोपवत होता. तेवढ्यात घराबाहेर गाडी थांबल्याचा त्याला आवाज आला. कीथला वाटले की त्याच्या पत्नीने काहीतरी ऑर्डर केलं आहे. मात्र पुढच्या काही वेळात अनेक वाहने त्याच्या घरासमोर थांबली. सर्व वाहनांमध्ये जेवणाची ऑर्डर होती. या सर्व ऑर्डर कीथच्या घरातून दिल्या असल्याचं त्याला सांगण्यात आलं. त्यावर कीथने असं काही घडलं नसल्याचं सांगत ऑर्डर घेऊन येणाऱ्यांशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. या सर्व वादावादीनंतर कीथने त्याचा फोन चेक केला असता त्याच्या मोबाईलवर तब्बल 80 हजार रुपये कट झाल्याचा मेसेज आला होता. नंतर त्याच्या लक्षात आलं की या सर्व ऑर्डर्स त्याच्या सहा वर्षाच्या मुलाने केल्या आहेत. त्या मुलाने वेगवेगळ्या रेस्टॉरंटमधून ऑर्डर केली होती. एवढंच नाही तर प्रत्येकाला 25 टक्के टिपही दिली होती.
फूड डिलिव्हरी ऑर्डरमध्ये पिझ्झा, जंबो कोळंबी, चिकन पिटा सँडविच, चिली चीज फ्राईज आणि बरंच काही समाविष्ट होते. कीथ ऑर्डर रद्द करण्याचा मार्ग शोधू शकला नाही. त्यांनं सांगितलं की त्याचा मुलगा सतत काहीतरी उचापती करतो, त्यामुळे या आधीही अशा अनेक घटना घडल्या आहेत. मुलं रडायला लागली तर त्यांना शांत बसवण्यासाठी पालक त्यांच्या हातात मोबाईल देतात आणि बिनधास्त होतात. पण मग मुलंही असं काहीतरी करतात की त्यामुळे पालकांच्या अकाउंटवरील पैसे उडतात.