मुंबई : वृत्तसंस्था
मुंबईतील मंत्रालय परिसरात एका व्यक्तीने आत्महत्येचा प्रयत्न केला. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाची आज कॅबिनेट बैठक होती. दुपारच्या वेळी या तरुणाने मंत्रालयात लावण्यात आलेल्या संरक्षक जाळीवर उडी मारली. अनेकदा मंत्रालयाच्या इमारतीवरून नागरिकांनी आंदोलन करण्यासाठी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे.
राज्याचे मुख्यमंत्री शिंदे यांच्या मंत्रालयात आज एका तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. मंत्रालयात असलेल्या जाळीवर उडी घेत त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला. जाळीमुळे त्याचा जीव वाचला आहे. हा तरुण बऱ्याच वेळ जाळीवर पडून होता. तिथेच तो आपल्या मागण्या काय आहेत, ते सांगत होता. त्यानंतर त्याला खाली उतरवलं. घटनास्थळी पोलिस दाखल झाले होते. बघ्यांची गर्दी मंत्रालयाच्या आतील परिसरामध्ये जमली होती. हा शेतकरी असल्याचं सांगितलं जात आहे. आपल्या मागण्या पूर्ण होत नसल्याने हे पाऊल उचलल्याचं या व्यक्तीने सांगितलं. या शेतकऱ्याने मुख्यमंत्र्यांच्या विरोधात घोषणाबाजीदेखील केली.



