Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » भवरलाल अ‍ॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनतर्फे साहित्य कला पुरस्कार जाहीर
    जळगाव

    भवरलाल अ‍ॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनतर्फे साहित्य कला पुरस्कार जाहीर

    editor deskBy editor deskAugust 25, 2022No Comments4 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    जैन उद्योग समूहाची सेवाभावी संस्था भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाउंडेशनतर्फे दुसरा व्दिवार्षिक ‘कांताई जैन साहित्य-कला जीवनगौरव पुरस्कार’ जगप्रसिद्ध चित्रकार श्री. प्रभाकर कोलते यांना तर श्रेष्ठ लेखिका म्हणून ‘कवयित्री बहिणाई पुरस्कारा’साठी श्रीमती संध्या नरे-पवार (बोरिवली, मुंबई), श्रेष्ठ कवी म्हणून ‘बालकवी ठोमरे पुरस्कारा’साठी श्री. वर्जेश सोलंकी (वसई, मुंबई) तर श्रेष्ठ गद्यलेखक म्हणून ‘ना. धों. महानोर पुरस्कारा’साठी श्री. प्रवीण बांदेकर (सावंतवाडी) यांना जाहीर झाला आहे. कांताई साहित्य-कला जीवनगौरव पुरस्काराचे स्वरूप दोन लक्ष रूपये, सन्मानचिन्ह, शाल-श्रीफळ असे आहे तर कवयित्री बहिणाई, बालकवी ठोमरे, ना. धों. महानोर या तिघंही पुरस्काराचे स्वरूप एक लक्ष रूपये, सन्मानचिन्ह, शाल-श्रीफळ असे आहे.

    कान्हदेशकन्या बहिणाबाई चौधरी यांच्या जयंतीच्या औचित्याने साहित्य-कला पुरस्कार प्रदान समितीची बैठक जैन हिल्सवर पार पडली. या बैठकीत निवड समितीचे अध्यक्ष सुप्रसिद्ध साहित्यिक ज्ञानपीठ सन्मानित डॉ. भालचंद्र नेमाडे, सदस्य रंगनाथ पठारे, प्रा. डॉ. सदानंद देशमुख, श्रीकांत देशमुख, डॉ. शोभा नाईक, डॉ. सिसिलिया कार्व्हालो, शंभू पाटील, भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनचे अध्यक्ष अशोक जैन, विश्वस्त ना. धों. महानोर, सौ. ज्योती जैन यांची उपस्थिती होती. डॉ. भालचंद्र नेमाडे यांच्या अध्यक्षतेखाली साहित्यिक मान्यवरांकडून आलेल्या शिफारसींचा विचार करून सर्वानुमते चारही पुरस्कारांची निवड करण्यात आली. ‘भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन’ व ‘बहिणाबाई मेमोरियल ट्रस्ट’ यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातील वाङमयीन क्षेत्रातील प्रतिभावंत, अनुभवसिद्ध लेखकांची कारकीर्द आणि बदलत्या साहित्यप्रवासाची सकारात्मक नोंद घेऊन ही निवड केली जाते.

    जैन उद्योग समूहाच्या कल्याणकारी अंग असलेल्या ‘भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन’ हा ट्रस्ट जैन इरिगेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा साहित्यिक डॉ. भवरलालजी जैन यांच्या पुढाकारातून साकारला आहे. या ट्रस्टतर्फे विविध सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन केले जाते. साहित्यिक उपक्रमांतर्गत बहिणाबाईंच्या नावे अखिल भारतीय पातळीवर ‘बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्ट’तर्फे कवयित्री बहिणाई पुरस्कार, ‘भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन’तर्फे बालकवी ठोमरे पुरस्कार, तसेच ना. धों. महानोर पुरस्कार दिला जातो. हे पुरस्कार देण्याबाबतचे बीजारोपण जैन इरिगेशनचे संस्थापक भवरलालजी जैन यांनी केले आहे. काव्य, कथा, कादंबरी, गद्यलेखन आदी वाङमय लेखनात लक्षणीय कामगिरी करणार्‍या साहित्यिकांची निवड करण्यात येते. या पुरस्कारांसाठी महाराष्ट्रातील प्रथितयश कवी, साहित्यिक, समीक्षकांकडून शिफारशी मागविण्यात येतात. शिफारस केलेल्या साहित्यिकांच्या कार्याचा आढावा घेऊन निवड समिती अंतिम पुरस्कारार्थींची निवड करते. पहिला पुरस्कार जगप्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांना सन्मानपूर्वक प्रदान केला आहे. तर यंदाचा दुसरा पुरस्कार जागतिक दर्जाचे चित्रकार प्रभाकर कोलते यांना जाहीर झाला आहे.

    बृहृन्महाराष्ट्रातील श्रेष्ठ लेखकांच्या निवड समितीने एकमताने केलेली ही निवड आतापर्यंतच्या कला-साहित्य पुरस्कार प्राप्त लेखकांच्या परंपरेत शोभून दिसतात. – डॉ. भालचंद्र नेमाडे, अध्यक्ष, निवड समिती

    कला-साहित्य क्षेत्रातील प्रतिभावंतांना प्रोत्साहन मिळावे यासाठी विविधस्तरावर रचनात्मक कार्य जैन उद्योग समूहातर्फे सुरूच असते. बहिणाबाई चौधरी यांच्या जयंतीच्या औचित्याने भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन, बहिणाबाई मेमोरियल ट्रस्टतर्फे देण्यात येणारे कला-साहित्य पुरस्कार जाहिर करताना आनंद होत आहे. – अशोक जैन, अध्यक्ष, भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन

    परिचय

    1) प्रभाकर कोलते – ‘कांताई जैन साहित्य-कला जीवनगौरव पुरस्कार’ ज्यांना जाहीर ते प्रभाकर कोलते मुंबई येथील जे.जे. कला महाविद्यालयात कलाशिक्षण घेऊन तेथेच हाडाचे प्राध्यापक होते. प्रभाकर कोलते कला शिक्षणाविषयी आपलं मत अतिशय प्रभावीपणे आणि स्पष्ट मांडतात त्यामुळेच ते कला विद्यार्थ्यांमध्ये अतिशय प्रिय आहेत. भारतीय अमूर्त कलेतील सध्याच्या नामांकित चित्रकारांमध्ये प्रभाकर कोलतेंचे नाव अग्रस्थानी आहे. अमूर्त कलेवर भाष्य करणारे आणि लिहीणाऱ्या अतिशय दुर्मिळ जागतिक दर्जाच्या चित्रकारांमध्येही ते पुढे आहेत. भारतीय अमूर्त कलेमध्ये काम करणाऱ्या क्रियाशील पिढीमध्ये बहूतांश चित्रकारांवर प्रभाकर कोलते यांचा प्रभाव आहे. संत परंपरेचा अभ्यास करून अमूर्ततेतील अध्यात्म सांगणारा योगी चित्रकार म्हणून त्यांची ओळख असून त्यांच्या अनेक चित्रमालिका देशात-परदेशात गाजलेल्या आहेत.

    2) संध्या नरे-पवार – श्रेष्ठ लेखिका म्हणून कवयित्री बहिणाई पुरस्कारासाठी संध्या नरे-पवार यांची निवड झाली. मुक्तपत्रकार व संधोधनपर लेखनामध्ये त्यांचे साहित्य आहे. आदिवासी स्त्रीयांविषयी संवेदनशील वास्तव मांडून अमानवी प्रथांवर प्रखड भाष्य करणारे ‘डाकीण’, ‘तिची भाकरी कोणी चोरली’ या पुस्तकांसह त्यांचे अनेक संशोधनपर लेख प्रसिद्ध झाले आहेत.
    3) प्रवीण दशरथ बांदेकर – सावंतवाडी येथील आरपीडी कॉलेज येथे इंग्रजीचे अध्यापन करतात. त्यांनी कविता, कादंबरी, ललित, समीक्षा आदी लेखन केले असून कविता संग्रह – ‘येरू म्हणे’, ‘खेळखंडोबाच्या नावानं…’, ‘चिनभिन’, कादंबऱ्या – ‘चाळेगत’, ‘उजव्या सोंडेच्या बाहुल्या’, ‘इंडियन अॅनिमल फार्म’, ललित लेख संग्रह – ‘घुंगुरकाठी’, ‘हरवलेल्या पावसाळ्यांचा शोध’, बालसाहित्य- ‘चिंटू चुळबुळे’ अशी पुस्तके प्रकाशित झाली आहे.
    4) वर्जेश सोलंकी – वर्जेश सोलंकी हे आगाशी ह्या लहानशा खेड्यात वास्तव्यास असून महाविद्यालय जीवनापासून काव्यलेखनाला त्यांनी सुरूवात केली. वर्जेश ईश्वरलाल सोलंकींच्या ‘कविता’, ‘ततपप’, ‘वेरविखेर’ हे काव्यसंग्रह प्रसिद्ध, ‘दीडदमडीना’ (ललितगद्य), ‘पेरूगन मुरूगन’ (लघुकांदबरी), ‘वृद्धशतक’ व ‘अनेक एक’ (कवी कमल वोरा ह्यांच्या गुजराती कवितांचा मराठी अनुवाद), ‘हुसैनभाय और गणपतभाय व्हाया अमेरिका’ (कथासंग्रह) इत्यादी साहित्य प्रकाशित असून अनेक कविता व कवितासंग्रहाचा अभ्यासक्रमात समावेश आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    वाळूमाफियांची दादागिरी वाढली : थेट तलाठ्याला केली जबर मारहाण !

    December 2, 2025

    एकाच झाडावर प्रेमीयुगुलाने संपविले आयुष्य !

    December 2, 2025

    युगेंद्र पवारांच्या लग्नात ‘आत्याबाई’ सुप्रिया सुळे रंगल्या सणसणीत ठेक्यावर

    December 1, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.