

जळगाव, दि.२२ (जिमाका ) – शेतकरी वर्षभर कष्ट करतो; मात्र धरणात पाणी उपलब्ध असूनही कालव्याच्या गळतीमुळे ते त्याच्या शेतापर्यंत पोहोचत नसेल, तर त्याच्या मेहनतीला न्याय मिळणार कसा? निम्न गिरणा कालव्याच्या जीर्ण अवस्थेमुळे विशेषतः शेवटच्या टोकावरील शेतकऱ्यांना अनेक वर्षांपासून सिंचनाच्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. कालव्याच्या सुरुवातीच्या भागातील शेतकऱ्याला पाणी आणि शेवटच्या टोकावरील शेतकऱ्याला प्रतीक्षा, ही परिस्थिती बदलण्यासाठीच शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून ४६ कोटी ७७ लाख रुपयांचा निधी मंजूर करून घेतला. त्यापैकी धरणगाव तालुक्यात सुमारे आठ कोटी रुपयांच्या कामांना सुरुवात होत आहे. ही कामे दर्जेदार व वेळेत पूर्ण होऊन त्यांचा प्रत्यक्ष लाभ शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे, असे प्रतिपादन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.
महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रमांतर्गत (MIIP) निम्न गिरणा कालव्याचे काँक्रीट अस्तरीकरण व जीर्ण बांधकामांच्या दुरुस्तीसाठी शासनाने ४६ कोटी ७७ लाख रुपयांची प्रशासकीय मान्यता दिली आहे. यापैकी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील धरणगाव तालुक्यात सुमारे आठ कोटी रुपयांची कामे होणार आहेत. धरणगाव–सोनवद रस्त्यावरील कालवा पाटचारी दुरुस्तीच्या कामाचे भूमिपूजन पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
पालकमंत्री गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, निम्न गिरणा कालवा ५० वर्षांपेक्षा जुना असून अनेक ठिकाणी पाण्याची गळती होत आहे. त्यामुळे धरणगाव आणि अमळनेर तालुक्यांतील शेवटच्या टोकावरील शेतकऱ्यांना पुरेसे व वेळेवर पाणी मिळण्यात अडचणी येतात. या कामांमुळे कालव्याची गळती व पाझर कमी होईल, पाण्याची वहनक्षमता वाढेल आणि सिंचनाचे आवर्तन कमी कालावधीत पूर्ण करण्यास मदत होईल. तसेच कालवा फुटण्याच्या घटना आणि त्यामुळे शेतजमिनींचे होणारे नुकसान कमी होण्यास मदत होणार आहे. सुमारे २ हजार ६६१ हेक्टर सिंचनक्षेत्र पुनर्स्थापित होणे, हा या कामांचा महत्त्वाचा फायदा आहे. उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर करून शेतकऱ्यांना सिंचनाच्या अधिक चांगल्या सुविधा मिळाव्यात, यासाठी संबंधित यंत्रणांनी कामे दर्जेदार व वेळेत पूर्ण करावीत, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
कालव्याची वहनक्षमता वाढणार; शेतकऱ्यांना मोठा फायदा – कार्यकारी अभियंता विनोद पाटील
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात गिरणा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विनोद पाटील यांनी प्रकल्पाची सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले की, पालकमंत्री गुलाबराव पाटील व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या विशेष पाठपुराव्यामुळे कालवा दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध झाला असून, या कामांचा लाभ परिसरातील हजारो शेतकऱ्यांना होणार आहे. सध्या कालव्याची पाणी वाहून नेण्याची क्षमता ५५० क्युसेक्स असून, दुरुस्तीनंतर ती संकल्पित ७३३.८२ क्युसेक्सपर्यंत वाढण्यास मदत होईल. कालवा व वितरिकांचे काँक्रीट अस्तरीकरण, जीर्ण जलसेतू, फॉल आणि इतर बांधकामांच्या दुरुस्तीमुळे पाण्याची गळती कमी होईल. लगतच्या शेतजमिनींचे व पिकांचे नुकसान टाळण्यासह सिंचन आवर्तनाचा कालावधी कमी होण्यास मदत होणार आहे. काही गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची उपलब्धता सुधारण्यासही यामुळे हातभार लागू शकतो, असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपविभागीय अधिकारी तुषार राजपूत यांनी केले तर आभार उपविभागीय अधिकारी गणेश पाटील यांनी मानले.
यावेळी युवा नेते माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, गिरणा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विनोद पाटील, उपविभागीय अभियंता कुलदीप पाटील व तुषार राजपूत, शाखा अभियंता संदीप पेंढारे, रोहित सावंत, प्रीतम काकडे व प्रमोद बोदडे, तालुका संघटक रवी चव्हाण, माजी उपनगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, सोसायटी संघाचे गजानन पाटील यांच्यासह आजी-माजी लोकप्रतिनिधी, विविध पक्षांचे पदाधिकारी, पाटबंधारे विभागाचे अधिकारी आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



