

मुक्ताईनगर, भडगाव, यावलमध्ये उमेदवार निश्चितीचे आव्हानमहाजनांची राजकीय कसोटी, किशोर पाटलांची आक्रमक भूमिका
महिला राखीवमधून पद्मजा देशमुख महाविकास आघाडीच्या एकमेव उमेदवार?
विजय पाटील लाईव्ह महाराष्ट्र न्युज : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत महायुतीचे जागावाटप निश्चित झाल्यानंतरही काही मतदारसंघांतील उमेदवार निश्चितीचा तिढा अद्याप सुटलेला नाही. भडगाव, मुक्ताईनगर आणि यावल या विकास सोसायटी मतदारसंघांमध्ये उमेदवारांबाबत एकमत होत नसल्याने महायुतीतील घटक पक्षांमध्ये राजकीय रस्सीखेच सुरू झाली आहे. विशेषतः मुक्ताईनगर मतदारसंघावरून भाजप आणि शिवसेना शिंदे गट आमनेसामने येण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे पालकमंत्री गुलाबराव पाटील व भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन यांच्यासमोर ही जागावाटपाची मोठी राजकीय परीक्षा उभी ठाकली आहे.
मुक्ताईनगर मतदारसंघात केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी दावा केला आहे. मात्र, शिवसेना शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील हे कोणत्याही परिस्थितीत हा मतदारसंघ भाजपला सोडण्यास तयार नसल्याची माहिती आहे. त्यामुळे महायुतीच्या जागावाटपातील हा सर्वाधिक प्रतिष्ठेचा विषय बनला आहे. भाजपने माघार घ्यावी की शिवसेनेने आपला दावा सोडावा, यावर अद्याप तोडगा निघालेला नाही. दोन्ही बाजूंची भूमिका ठाम असल्याने वरिष्ठ नेत्यांची मध्यस्थी निर्णायक ठरणार आहे.
दुसरीकडे, एनटी राखीव मतदारसंघातही शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांनी डॉ. विजय पाटील यांच्या उमेदवारीसाठी जोरदार आग्रह धरला आहे. हा मतदारसंघ भाजपला देण्यास त्यांचा विरोध असल्याचे समजते. गरज पडल्यास आमनेसामने लढण्याचीही त्यांची तयारी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यामुळे या जागेवरही महायुतीतील अंतर्गत संघर्ष उघड होण्याची शक्यता आहे. भडगाव आणि यावल मतदारसंघातील उमेदवार निश्चितीचाही प्रश्न कायम असल्याने जागावाटपाचा तिढा अधिकच गुंतागुंतीचा बनला आहे.
दरम्यान, महिला राखीव मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पद्मजा देशमुख यांची उमेदवारी निश्चित झाल्याचे समजते. त्या महाविकास आघाडीच्या एकमेव उमेदवार असण्याची शक्यता असून, महायुतीच्या जागावाटपात महाविकास आघाडीतील उमेदवाराला स्थान मिळाल्याने या घडामोडीला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. महाविकास आघाडीला अन्य जागांवर संधी मिळणार की पद्मजा देशमुख यांच्याच उमेदवारीवर समाधान मानावे लागणार, हा प्रश्नही उपस्थित झाला आहे.
मतदारांच्या सहलींनी राजकीय वातावरण तापले!
उमेदवार निश्चितीचा तिढा सुरू असतानाच मतदारांची जुळवाजुळव आणि त्यांची संभाव्य भूमिका यावरही राजकीय नेत्यांनी लक्ष केंद्रित केले आहे. बोदवड विकास सोसायटी मतदारसंघातील शिवसेनेचे गोपाल गंगागिरी यांनी काही मतदारांना सहलीसाठी रवाना केल्याची माहिती समोर आली आहे. तर आमदार किशोर पाटील यांनी पाचोरा आणि भडगाव तालुक्यांतील काही मतदारांना सहलीवर पाठविल्याची चर्चा आहे. त्यामुळे निवडणुकीतील उमेदवार निश्चितीबरोबरच मतदारांची बांधणी आणि त्यांची फळी सुरक्षित ठेवण्याच्या हालचालींनाही वेग आला आहे.
अकरा वाजता होणाऱ्या बैठकीकडे लक्ष; महाविकास आघाडीच्या वाट्याला एकच जागा?
आज सकाळी अकरा वाजता पुन्हा एकदा महायुतीच्या नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक होणार असून, या बैठकीत महाविकास आघाडीच्या जागांबाबतही चर्चा होण्याची शक्यता आहे. मात्र, विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महाविकास आघाडीच्या वाट्याला महिला राखीव मतदारसंघातील पद्मजा देशमुख यांची एकमेव जागा येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. उर्वरित जागांवर महायुतीचेच उमेदवार राहण्याचे संकेत मिळत आहेत.
एकीकडे भाजपला मुक्ताईनगरची जागा हवी आहे, तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाने एनटी आणि इतर मतदारसंघांवर आपली पकड कायम ठेवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
त्यात किशोर पाटील यांची आक्रमक भूमिका आणि चंद्रकांत पाटील यांचा मुक्ताईनगरवरील आग्रह यामुळे गिरीश महाजन यांच्यासाठी समन्वय साधणे सोपे राहिलेले नाही. त्यामुळे आजच्या बैठकीत कोण माघार घेणार आणि कोणाच्या राजकीय प्रतिष्ठेला धक्का बसणार, यावरच जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील पुढील राजकीय समीकरणे ठरणार आहेत.



