

जळगावः प्रतिनिधी
मद्यपान करून वाहन चालविणाऱ्या ४९ जणांसह वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ५२६ वाहनधारकांवर पोलिसांनी कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून २ लाख १३ हजार ८५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई १४ नोव्हेंबर रोजी रात्री जिल्हाभरात जिल्हा पोलीस दलाने केली.
मद्यपान करून वाहन चालविणाऱ्यांना आळा बसावा व वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाभरात एकाच वेळी विशेष मोहीम राबविण्यात आली. यामध्ये सर्व उपविभागीय अधिकारी, पोलिस ठाण्याचे प्रभारी, कर्मचारी तसेच वाहतूक शाखेचे प्रभारी व कर्मचारी सहभागी झाले होते. या मोहिमेंतर्गत जिल्हाभरात विविध ठिकाणी वाहनांची तपासणी करण्यात आली. त्यात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ५२६ जणांवर कारवाई करण्यात आली. त्यांना २ लाख १३ हजार ८५० रुपये दंड करण्यात आला. या मोहिमेमध्ये ३० जण उघड्यावर मद्यपान करताना आढळले. त्यांच्यावरही कारवाई करण्यात आली.
अशी झाली कारवाई
ड्रंक अँड ड्राईव्ह – ४९
फॅन्सी नंबर प्लेट – १५
तीन सीट प्रवास – ४
विना वाहन परवाना – १
विना हेल्मेट – ६२
कलम ६६/१९२-८
मोटार वाहन कायदा – ३५६
इतर ३१



