

पारोळा : प्रतिनिधी
तालुक्यातील भोकरबारी धरणाजवळ अज्ञात वाहनाने दिलेल्या जबर धडकेत ४२ वर्षीय मंगेश दिनकर जगताप यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना ८ नोव्हेंबरला रात्री १०.१५ वाजेच्या सुमारास घडली. अपघातानंतर वाहनचालक घटनास्थळावरून पसार झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
शहरातील भाटे मंदिरासमोर मयत मंगेश दिनकर जगताप (वय ४२) हे कुटुंबासह राहत होते. दरम्यान, मंगेश जगताप यांना ८ नोव्हेंबरला रात्री १०.१५ वाजेच्या सुमारास भोकरबारी धरणाजवळ अज्ञात वाहनाने जबर धडक दिली. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली होती. अपघाताची माहिती मिळताच नातेवाइकांनी त्यांना तातडीने रुग्णवाहिकेद्वारे पारोळा येथील कुटीर रुग्णालयात दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती रात्री १०.३० वाजता त्यांना मयत घोषित केले. विशेष म्हणजे, अपघातानंतर संबंधित अज्ञात वाहनचालकाने जखमी व्यक्तीला मदत न करता पळ काढल्याचा आरोप फिर्यादीत केला आहे. या प्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, प्रत्यक्षदर्शीची माहिती आणि अन्य तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास करून दोषी वाहनचालकाचा शोध घ्यावा, अशी अपेक्षा कुटुंबियांकडून व्यक्त होत आहे. या घटनेने जगताप कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरात शोककळा पसरली आहे. तपास पोलीस निरीक्षकासह पो.हे.कॉ. डॉ. शरद पाटील करत आहेत.



