

जळगाव : प्रतिनिधी
कोरोना कक्षात बेड साईड असिस्टंट म्हणून ड्युटीवर असताना एका महिला कर्मचाऱ्याचा हात पकडून व दुपट्टा ओढून विनयभंग केल्याप्रकरणी जळगावच्या मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याचा निकाल लागला आहे. न्यायालयाने दोष सिद्ध झालेल्या अमोल सुधाकर तायडे (वय २१) व शंकर नितीन सोनवणे (वय २३, दोन्ही रा. आसोदा रोड, मोहन टॉकीज जवळ) या दोघांना तीन महिन्यांच्या साधी कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
जिल्हा पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत दि. १६ एप्रिल २०२१ रोजी पीडित महिला कोरोना कक्षात बेड साईड असिस्टंट म्हणून ड्युटीवर कार्यरत होती. त्या दरम्यान आरोपी कोरोना कक्षात आले असता, फिर्यादीने त्यांना तुम्ही येथे का आलात? अशी विचारणा केली. या गोष्टीचा राग आल्यामुळे आरोपींनी फिर्यादीचा हात पकडून व दुपट्टा ओढून विनयभंग केला होता. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस उपनिरीक्षक रविंद्र तायडे यांनी या प्रकरणाचा तपास करून दि. २१ ऑगस्ट २०२१ रोजी न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते. या खटल्यात एकूण ९ साक्षीदार तपासण्यात आले, पैकी ५ जणांची साक्ष झाली नाही. या खटल्यात सरकारी वकील म्हणून योगेश मेटकर यांनी काम पाहिले. पैरवी अंमलदार म्हणून पोलीस मुख्यालय जळगावचे पो.हे.कॉ. सुनील पाटील यांनी सहकार्य केले.



