
जळगाव : प्रतिनिधी
पुढे खून झाला असून आम्ही पोलीस असल्याची बतावणी करीत दोन जणांनी वसंतराव सिताराम पाटील (रा. म्हसावद, ता. जळगाव) यांच्यासह त्यांच्या पत्नीचे दागिने रुमालात बांधून डिक्कीत ठेवण्यास सांगितले. त्यानंतर हाताचालाखी करीत त्या दोघांनी ९० हजार रुपये किंमतीचे अडीच तोळे सोन्याचे दागिने लंपास केले. ही घटना दि. १३ ऑक्टोंबर रोजी सकाळी साडेअकरा वाजता घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वे विभागात सेक्शन इंजिनिअर म्हणून सेवानिवृत्त झालेले वसंतराव पाटील हे दि. १३ रोजी पत्नी लताबाई पाटील यांच्यासोबत त्यांची कुलदैवतेच्या दर्शनासाठी नांद्रा ता. जळगाव येथे दुचाकीने जाण्यासाठी निघाले. म्हसावद रेल्वे गेट ओलांडून पुढे पाथरी रोडने जात असतांना त्यांना दोन इसमांनी थांबण्याचा इशारा केला. मात्र पाटील दाम्पत्य न थांबता पुढे निघून गेले.
त्यावेळी त्या दोघ इसमांनी पाठलाग करीत आम्ही पोलीस वाले असून तुम्हाला थांबण्यास सांगितले तरी तुम्ही थांबत का नाही असे म्हणू लागले. तसेच नेरी ते सिल्लोड मध्ये एका महिला आणि पुरुषाचा खून झाला असून तुम्ही सोन्याची अंगठी घालून कुठे चालले असे म्हणू लागल्याने वसंतराव पाटील यांनी दुचाकी थांबवली आणि त्या दोघ इसमांनी त्यांची दुचाकी त्यांच्या पाठीमागे काही अंतरावर उभी केली. दुचाकीवर मागे बसलेला इसम पाटील दाम्पत्याजवळ आला. त्याने पोलीस असल्याचे ओळखपत्र त्यांना दाखवित पुढे चेकींग सुरु असून अंगावरील दागिने काढून रुमालात ठेवा असे म्हणू लागला. त्यानुसार वसंतराव पाटील यांनी बोटातील अंगठी काढल्यानंतर त्यांची पत्नीने देखील गळ्यातील पोत आणि कानातील झुमके आणि पैसे व डायरी काढून रुमालात ठेवले.
सोन्याचे दागिने आणि पैसे रुमालात ठेवल्यानंतर त्या ईसमांनी रुमाल बांधून तो गाडीच्या डिक्कीत ठेवल्यानंतर पाटील दाम्पत्य हे देवीच्या दर्शनासाठी निघाले. थोड्या अंतरावर गेल्यानंतर त्यांना संशय आल्याने त्यांनी डिक्कीत ठेवलेला रुमाल उघडून बघितला. त्यावेळी त्यांना रुमालात डायरी व्यक्तरीक्त काहीही मिळून आले नाही.
हातचालाखी करीत त्या दोघ अनोळखी इसमांनी पाटील दाम्पत्याजवळील दीड तोळे सोन्याची पोत, ५ ग्रॅमचे टॉप्स आणि कानातील सोन्याचे वेल, ५ ग्रॅमची सोन्याची अंगठी असा एकूण ९० हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला. आपली फसवणुक झाल्याचे कळताच त्यांनी लागलीच एमआयडीसी पोलिसात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार दोघ भामट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



