
जळगाव : प्रतिनिधी
कासोदा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शेतातून चोरीस गेलेल्या २३ शेळ्या-बोकड चोरीच्या गुन्ह्याचा पोलिसांनी मध्यप्रदेशात जाऊन छडा लावला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतले असून, चोरीस गेलेल्या शेळ्या-बोकडांची वाहतूक करण्यासाठी वापरण्यात आलेले वाहनही जप्त करण्यात आले आहे.
कासोदा पोलीस ठाण्यात फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ३ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी साडेसात वाजेपासून ४ सप्टेंबर रोजी सकाळी सहा वाजेपर्यंत कासोदा परिसरातील त्यांच्या शेतातील पत्री शेडमधून १८ लहान-मोठ्या शेळ्या आणि ५ लहान-मोठे बोकड, अशी एकूण २३ जनावरे अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली होती. या प्रकरणी कासोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन जळगावचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी कासोदा पोलिसांना गुन्ह्याचा सखोल तपास करून आरोपींचा शोध घेण्याबाबत मार्गदर्शन केले. त्यानुसार कासोदा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक श्रीकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली तपास पथक तयार करण्यात आले.
तांत्रिक तपास तसेच प्राप्त गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांना चोरीचा धागा मध्यप्रदेशातील खरगोन जिल्ह्यातील भगवानपुरा तालुक्यातील बडी गावापर्यंत मिळाला. त्यानंतर पोलिसांनी तेथे जाऊन संशयित आरोपींचा शोध घेतला. या कारवाईत अजय राजू चौहान (रा. साईखेडी, ता. भगवानपुरा, जि. खरगोन, मध्यप्रदेश) आणि सोहन विश्राम ब्राम्हणे (रा. बडी, ता. भगवानपुरा, जि. खरगोन, मध्यप्रदेश) या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांनी आरोपींकडे चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याचे प्रेस नोटमध्ये नमूद करण्यात आले आहे. तसेच चोरीस गेलेल्या शेळ्या-बोकडांची वाहतूक करण्यासाठी वापरण्यात आलेले वाहन त्यांच्या ताब्यातून जप्त करण्यात आले आहे.
या गुन्ह्यात आणखी काही आरोपींचा सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. त्यामुळे या प्रकरणातील इतर आरोपींचा तसेच चोरीस गेलेल्या उर्वरित मुद्देमालाचा शोध घेण्यासाठी पोलिसांची कारवाई सुरू आहे. या उल्लेखनीय कारवाईस पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, चाळीसगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली कासोदा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी श्रीकांत पाटील तसेच त्यांच्या पथकाने कामगिरी बजावली. शेळ्या-बोकड चोरीसारख्या गुन्ह्यांचा तपास करताना तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे थेट मध्यप्रदेश गाठून आरोपींना ताब्यात घेतल्याने कासोदा पोलिसांच्या या कारवाईचे विशेष कौतुक होत आहे.



