मुंबई : वृत्तसंस्था
जून महिन्याच्या सुरुवातीला राज्यात दाखल झालेल्या मान्सूनने काही भागांत हजेरी लावल्यानंतर अचानक विश्रांती घेतल्याने शेतकरी आणि नागरिकांमध्ये चिंता निर्माण झाली होती. जून महिना संपत आला तरी समाधानकारक पाऊस न झाल्याने खरीप हंगामावर संकटाची छाया निर्माण झाली होती. मात्र आता मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झाला असून राज्यातील अनेक भागांत पावसाने दमदार पुनरागमन केले आहे. याच पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाने पुढील ४८ तासांत राज्यातील विविध भागांत जोरदार ते अतिजोरदार पावसाचा इशारा दिला आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, मराठवाडा, पुणे विभाग आणि कोकण किनारपट्टीत मान्सूनने जोरदार प्रगती केली आहे. काही दिवस कोकणात रेंगाळलेला मान्सून आता वेगाने पुढे सरकला असून तो पुणे आणि मराठवाड्याच्या दक्षिण भागापर्यंत पोहोचला आहे. पुणे हवामान विभागाचे हवामानशास्त्रज्ञ एस. डी. सानप यांनी ही माहिती दिली आहे.
मान्सूनच्या या प्रगतीमुळे पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. अनेक ठिकाणी पेरण्यांसाठी आवश्यक वातावरण तयार होत असून खरीप हंगामाला नवसंजीवनी मिळण्याची आशा व्यक्त केली जात आहे.
भारतीय हवामान विभागाने पुढील दहा दिवस मान्सूनच्या वाटचालीसाठी अत्यंत अनुकूल असल्याचे स्पष्ट केले आहे. विशेषतः आगामी ४८ तास मान्सूनच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणार असून धाराशिव, पुणे, सोलापूर तसेच कोकणातील काही जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या भागांमध्ये नागरिकांनी आणि प्रशासनाने सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, सोमवारी नाशिक, नागपूर, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली. अनेक भागांत शेतकऱ्यांनी पावसाचे स्वागत करत शेतीकामांना सुरुवात केली आहे. धरणांच्या पाणीसाठ्यातही वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
मात्र विदर्भातील नागरिकांना आणि शेतकऱ्यांना मान्सूनसाठी आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील तीन ते चार दिवसांत मान्सून यवतमाळ आणि गडचिरोली जिल्ह्यांत दाखल होण्याची शक्यता आहे. त्यानंतर चार ते पाच दिवसांत संपूर्ण विदर्भात मान्सून सक्रिय होऊन दमदार पावसाची सुरुवात होण्याची अपेक्षा आहे. एकूणच, पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या महाराष्ट्रासाठी ही दिलासादायक घडामोड मानली जात असून आगामी काही दिवसांत राज्यभर पावसाची जोरदार बॅटिंग होण्याची चिन्हे आहेत.



