जळगाव : प्रतिनिधी
दारूचे व्यसन आणि पत्नीवर घेत असलेल्या संशयातून नशिराबाद येथे एका पतीने आपल्या पत्नीचा कोयत्याने वार करून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना सोमवारी (२२ जून) दुपारी घडली. या घटनेमुळे संपूर्ण परिसर हादरून गेला असून सात वर्षांच्या निष्पाप मुलाचे मातृछत्र हिरावल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. मंदा विकास जाधव (वय २८, रा. भवानीनगर, नशिराबाद) असे मृत महिलेचे नाव असून, विकास जगन जाधव (वय ३३) असे आरोपी पतीचे नाव आहे. या प्रकरणी नशिराबाद पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विकास जाधव याला दारूचे व्यसन होते. दारूच्या नशेत तो पत्नी मंदा हिला वारंवार मारहाण करून मानसिक व शारीरिक छळ करत असे. त्याचबरोबर तो तिच्या चारित्र्यावरही संशय घेत असल्याने घरात नेहमीच वाद होत होते. सोमवारी दुपारी हा वाद टोकाला गेला. गावातील खंडेराव मंदिराच्या ओट्यावर असताना विकास जाधव याने पत्नी मंदा हिच्या डोक्यावर कोयत्याने जोरदार वार केला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. गंभीर जखमी झालेल्या मंदा या रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्या.
घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी तातडीने पोलिसांना कळविले. सहाय्यक पोलिस निरीक्षक योगिता नारखेडे आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जखमी महिलेला तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
या घटनेनंतर मृत महिलेचे नातेवाईक विशाल मोरे यांनी नशिराबाद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार आरोपी विकास जाधव याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत काही तासांतच आरोपीला अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक योगिता नारखेडे करीत आहेत.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलिस अधीक्षक संदीप गावित तसेच भुसावळ विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी केदार बारबोले यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या दुर्दैवी घटनेमुळे जाधव दाम्पत्याच्या सात वर्षांच्या मुलाचे मातृछत्र हरपले आहे. कौटुंबिक कलह आणि संशयाच्या विळख्यात एका महिलेचा बळी गेल्याने नशिराबाद परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.



