जळगाव : प्रतिनिधी
जळगाव जिल्हा पोलिस दलात प्रशासकीय कारणास्तव आणि कायदा व सुव्यवस्था अधिक प्रभावीपणे राबविण्याच्या उद्देशाने मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. जिल्हा पोलिस आस्थापना मंडळाच्या बैठकीतील निर्णयानुसार १२ पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नव्या नियुक्त्या व बदली आदेश जारी करण्यात आले आहेत. हा आदेश पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी काढला आहे.
आदेशानुसार नाशिक, धुळे, अहमदनगर, यवतमाळ, अकोला तसेच जळगाव जिल्ह्यातील विविध ठिकाणांहून आलेल्या अधिकाऱ्यांना जळगाव जिल्ह्यातील विविध पोलिस ठाणे व शाखांमध्ये जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. धरणगाव, पारोळा, चोपडा ग्रामीण, शहर वाहतूक शाखा, भुसावळ तालुका, एमआयडीसी व स्थगुशा जळगाव येथे नव्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. धरणगाव पोलीस स्थानकाचा पदभार पोलीस निरीक्षक उमाकांत सुधाकर गायकवाड यांनी नुकताच स्वीकारला आहे.
नव्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक उमाकांत सुधाकर गायकवाड यांची धरणगाव पोलिस ठाण्याच्या प्रभारी पदावर, तर पोलीस निरीक्षक दीपक दादा पाटील यांची पारोळा पोलिस ठाण्याच्या प्रभारी पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक संजय जयसिंग सोनवणे यांच्याकडे चोपडा ग्रामीण पोलिस ठाण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. याशिवाय पोलीस निरीक्षक मोरेश्वर लक्ष्मण पंधम यांची शहर वाहतूक शाखेत नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच सहाय्यक पोलिस निरीक्षक, सहाय्यक फौजदार व पोलीस उपनिरीक्षक स्तरावरील अधिकाऱ्यांच्या नियुक्त्याही करण्यात आल्या आहेत. काही अधिकाऱ्यांना नव्याने हजर करण्यात आले असून काहींना पदोन्नतीनंतर नवीन जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, पारोळा पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलिस निरीक्षक सचिन सिताराम सानप यांचे रुग्णेदान प्रलंबित असल्याने त्यांना सध्या कार्यमुक्त करण्यात आले असून त्यांच्या पुढील नियुक्तीबाबत जिल्हा पोलिस आस्थापना मंडळाच्या बैठकीत निर्णय घेतला जाणार आहे. तसेच सहाय्यक पोलिस निरीक्षक योगेश जनार्दन महाजन यांनाही पारोळा पोलिस ठाण्याच्या प्रभारी पदाच्या कार्यभारातून मुक्त करण्यात आले आहे.



