जळगाव : प्रतिनिधी
महाराष्ट्रातील बॉक्सिंग क्रीडेला चालना देण्यासाठी आणि राज्यातील गुणवंत खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धा 2026 चे आयोजन जळगाव येथे करण्यात आले आहे. या स्पर्धेला राज्यभरातील बॉक्सिंगपटू, प्रशिक्षक, पंच, अधिकारी आणि क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असून सुमारे 1500 हून अधिक क्रीडाप्रेमी व खेळाडूंचा सहभाग अपेक्षित आहे.
ही प्रतिष्ठेची स्पर्धा 11 जून ते 15 जून 2026 या कालावधीत सुगोकी लॉन अँड रिसॉर्ट, पाळधी (ता. धरणगाव, जि. जळगाव) येथे पार पडणार आहे. स्पर्धेच्या आयोजनासाठी बॉक्सिंग असोसिएशन ऑफ जळगाव, सुगोकी ग्रुप ऑफ पाळधी तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव यांचे सहकार्य लाभले आहे.
आयोजकांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून खेळाडू या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. राज्यातील सर्वोत्तम बॉक्सर्समध्ये होणाऱ्या या चुरशीच्या लढतींमुळे क्रीडारसिकांना उच्च दर्जाच्या बॉक्सिंगचा थरार अनुभवता येणार आहे. स्पर्धेच्या निमित्ताने जळगाव जिल्ह्याला राज्यस्तरीय क्रीडा आयोजनाची मोठी संधी मिळाली असून स्थानिक क्रीडाक्षेत्राला त्याचा फायदा होणार आहे. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी बॉक्सिंग असोसिएशन ऑफ जळगावचे अध्यक्ष निलेश बाविस्कर यांच्यासह विविध पदाधिकारी आणि क्रीडाप्रेमी कार्यरत आहेत. तसेच सुगोकी ग्रुप ऑफ पाळधीचे सहकार्यही स्पर्धेला लाभत आहे. आयोजकांनी क्रीडाप्रेमींना स्पर्धास्थळी उपस्थित राहून खेळाडूंचे मनोबल वाढविण्याचे आवाहन केले आहे.
राज्यातील बॉक्सिंग क्षेत्रातील ही एक महत्त्वाची स्पर्धा मानली जात असून, या स्पर्धेतून अनेक नवोदित आणि गुणवंत खेळाडूंना राष्ट्रीय स्तरावर झेप घेण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे राज्यातील क्रीडा वर्तुळाचे लक्ष या स्पर्धेकडे लागले आहे.



