पुणे : वृत्तसंस्था
कॉकरोच जनता पार्टी आता पुण्यात आंदोलन करणार आहे. कॉकरोच जनता पार्टीचा संस्थापक अभिजीत दीपके यानं ही घोषणा केली आहे. ११ जून रोजी पुण्यात हे आंदोलन होईल. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करणार आहेत. दिल्लीतील जंतर – मंतरवर आंदोलन केल्यानंतर कॉकरोच जनता पार्टी हे दुसरं आंदोलन करणार आहे. दिल्लीत जंतर-मंतरवर ६ जून रोजी कॉकरोच जनता पार्टीनं आंदोलन केलं होतं. पार्टीचा संस्थापक अभिजीत दीपके हा या आंदोलनात सहभागी झाला होता.
तिथेही त्यांनी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली होती. आता दिल्लीनंतर थेट महाराष्ट्रातील पुण्यात आंदोलन करण्यात येणार आहे. दीपके आणि पक्षाच्या वतीने या आंदोलनाबाबत माहिती दिली आहे. यासंदर्भात त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. महाराष्ट्रातील पुण्यात आंदोलन करण्यात येणार असून, शिक्षण मंत्री प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येणार आहे. येत्या गुरुवारी (ता. ११) संध्याकाळी ४ वाजता पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठात या आंदोलनाचे आयोजन करण्यात येणार आहे. कॉकरोच जनता पार्टीच्या घोषणेनंतर पक्षाने शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी शनिवार, ६ जून रोजी दिल्लीच्या जंतर मंतरवर पहिलं आंदोलन केले होते. या आंदोलनात विद्यार्थ्यांसह नागरिक सहभागी झाले होते. पक्षाचा संस्थापक अभिजीत दीपके हा या आंदोलनासाठी अमेरिकेहून दिल्लीत पोहोचला होता. सोनम वांगचूक हे देखील या आंदोलनात सहभागी झाले होते. जंतर-मंतरवरील आंदोलनात अनेक नागरिक कॉकरोचचे मुखवटे घालून आले होते. अनेक विद्यार्थी आपल्या पालकांसमवेत जंतर – मंतरवर आले होते.



