धरणगाव : प्रतिनिधी
धरणगाव तालुक्यातील वराड गावाजवळ बुधवारी (दि. २८ एप्रिल) सकाळी सुमारे ९ वाजेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघाताने परिसरात खळबळ उडाली आहे. वापी (गुजरात) येथून अकोल्याकडे निघालेल्या क्रूझर गाडीचे चालत्या स्थितीत चाक निखळल्याने गाडी उलटली. या दुर्दैवी घटनेत नववधूसह तिघांचा जागीच मृत्यू झाला असून सहा जण गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, अकोला येथील पूजा रवी वागडकर (वय २२) हिचा विवाह नुकताच गुजरात राज्यातील वापी येथे पार पडला होता. लग्नानंतर पहिल्यांदाच ती आपल्या नातेवाईकांसोबत माहेरी अकोल्याकडे परतत होती. कुटुंबात आनंदाचे वातावरण असतानाच नियतीने घात केला. बुधवारी सकाळी क्रूझर गाडी (क्रमांक MH 30 AZ 4710) वराड गावाजवळून जात असताना अचानक गाडीचे एक चाक निखळले. वाहनाचा वेग जास्त असल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि गाडी रस्त्यावर उलटून भीषण अपघात झाला.
या अपघातात नववधू पूजा रवी वागडकर, दत्तू तुळशीराम भागवत (वय ४२) आणि जगदीश चंद्रभान वागडकर (वय ५२) यांचा जागीच मृत्यू झाला. एका क्षणात लग्नाचा आनंद शोकात परिवर्तित झाला असून वागडकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
दरम्यान, या अपघातात अन्य सहा प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींमध्ये प्रेम भारत वाकडकर (वय २४), नितेश सुरेश काठोडे (वय ३५), अमोल दामोदर गीते (वय ३५), रवी प्रभाकर वाघोडकर (वय ३२), तुळशीराम भीमराव भागवत (वय ६७) आणि १४ वर्षीय अंश नितेश काठोडे यांचा समावेश आहे.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेतली. जखमींना तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून, अचानक झालेल्या या अपघाताने सर्वत्र शोककळा पसरली आहे. पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.



