भुसावळ : प्रतिनिधी
तालुक्यातील वरणगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर परिसरात लग्नाच्या हळदी समारंभा दरम्यान झालेल्या वादातून मारहाणीची गंभीर घटना घडली असून, कोयत्याने हल्ला केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी आतिश सिद्धार्थ इंगळे (वय ३८, रा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, वरणगाव) यांनी वरणगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, दि. २५ शनिवार रोजी रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास हळदी समारंभातील नाचगाण्याच्या कार्यक्रमात धक्का लागल्याच्या कारणावरून वाद झाला. या वादातून आरोपी गौरव राहुल कोरोसीया, हर्षल राहुल कोरोसीया आणि रोशन माळी (सर्व राहणार वरणगाव) यांनी फिर्यादीस शिवीगाळ करत चापटा-बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच गौरव कोरोसीया व रोशन माळी यांनी विटांनी मारहाण करून दुखापत केली.
दरम्यान, हर्षेल राहुल कोरोसीया याने घरातून कोयता आणून फिर्यादीच्या डोक्यावर वार केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. या हल्ल्यात फिर्यादी जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेप्रकरणी वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळावरून कोयता व विटा जप्त करण्यात आल्या असून, सपोनि अमित कुमार बागुल याचे मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल सुभाष सपकाळ करीत आहेत. या प्रकरणाचा अहवाल न्यायालयात सादर करण्यात आला असून, आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.



