बारामती : वृत्तसंस्था
राज्यात अंधश्रद्धा व अघोरी प्रथांबाबत सुरू असलेल्या चर्चेला आता नवे वळण मिळाले असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी केलेल्या सोशल मीडिया पोस्टमुळे बारामतीत खळबळ उडाली आहे. नाशिक येथील भोंदूबाबा प्रकरणानंतर आधीच तापलेल्या राजकीय वातावरणात या नव्या दाव्यांमुळे अधिकच तणाव निर्माण झाला आहे.
मिटकरी यांनी आपल्या पोस्टमध्ये बारामतीतील सहयोग घर, काटेवाडी येथील निवासस्थान तसेच विद्या प्रतिष्ठान परिसरात अघोरी विधी झाल्याचा संशय व्यक्त केला आहे. त्यांच्या मते, असे प्रकार बाहेरून आलेल्या व्यक्तींना करणे शक्य नसून, यामागे स्थानिक पातळीवरील काही प्रभावशाली घटकांचा सहभाग असू शकतो. या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
डिसेंबर २०२५ मधील एका घटनेचा उल्लेख करत त्यांनी विद्या प्रतिष्ठानच्या एआय इमारतीच्या बांधकाम परिसरात मध्यरात्री अघोरी पूजा मांडण्यात आल्याचा दावा केला आहे. यासंदर्भातील काही छायाचित्रेही त्यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहेत. विशेष म्हणजे, दुसऱ्या दिवशी सकाळी अजित पवार या ठिकाणी पाहणीसाठी येणार होते, असेही त्यांनी नमूद केले आहे.
तसेच, २८ डिसेंबर २०२५ रोजीही याच परिसरात अशाच प्रकारची अघोरी पूजा झाल्याचा उल्लेख त्यांनी केला आहे. या घटनांना “भयावह” संबोधत त्यांनी या प्रकरणाची गंभीरता अधोरेखित केली आहे.
याशिवाय, काटेवाडीतील खताळपट्टा परिसरात अजित पवार यांच्या बंगल्यासमोर आणखी एक धक्कादायक प्रकार घडल्याचा दावा करण्यात आला आहे. स्थानिकांच्या माहितीनुसार, विमान अपघातापूर्वी त्या ठिकाणी बोकड उलटे टांगून त्याखाली अघोरी पूजा करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. काही महिन्यांनंतर हा प्रकार उघडकीस आल्याने परिसरात भीती व संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, या सर्व घटनांमागील सत्य बाहेर यावे, अशी मागणी अमोल मिटकरी यांनी केली आहे. अंधश्रद्धेला विरोध करणाऱ्या अजित पवार यांच्या परिसरातच असे प्रकार घडल्याचे नमूद करत, यामागील दोषींवर कारवाई व्हावी, तसेच सखोल तपास करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
या प्रकरणामुळे बारामतीसह संपूर्ण राज्याच्या राजकीय वर्तुळात नवा वाद निर्माण झाला असून, पुढील तपासातून नेमके काय निष्पन्न होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



