बीड : वृत्तसंस्था
बीड जिल्ह्यातून पुन्हा एकदा धक्कादायक घटना समोर आली असून, आई-मुलाच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारा प्रकार उघडकीस आला आहे. केज तालुक्यातील एका गावात सावत्र आई आपल्या सावत्र मुलासोबत फरार झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे सामाजिक आणि कौटुंबिक मूल्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित व्यक्तीला दोन मुले व दोन मुली असून दोन्ही मुलींची लग्ने झाली आहेत. कौटुंबिक वादामुळे त्याची पहिली पत्नी मागील १५ वर्षांपासून माहेरी राहत आहे. त्यामुळे चार वर्षांपूर्वी त्या व्यक्तीने एका परित्यक्त्या महिलेशी दुसरे लग्न केले होते. सुरुवातीला सर्व काही सुरळीत सुरू असताना कालांतराने या महिलेचे आपल्या सावत्र मुलाशी अनैतिक संबंध जुळल्याचे समोर आले.
एकाच घरात राहत असताना दोघांमध्ये जवळीक वाढत गेली. या संबंधाची कुणकुण गावकऱ्यांनाही लागली होती. दरम्यान, महिलेचा पती १२ एप्रिल रोजी देवदर्शनासाठी मुंबईला गेला असताना ही संधी साधून संबंधित महिला आपल्या सावत्र मुलासोबत घरातून पसार झाली.
पती परत आल्यानंतर ही बाब उघडकीस आली. यानंतर त्याने तातडीने पोलिसांत धाव घेऊन तक्रार दाखल केली. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक बाबासाहेब बांगर करत आहेत.
दरम्यान, फरार झालेली महिला आणि तिचा सावत्र मुलगा तेलंगणात गेल्याचा संशय आहे. ते ज्या दुचाकीवरून (एमएच 13 बीयू 1587) गेले, ती दुचाकी महिलेच्या जावयाची असल्याचे समोर आले आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी तेलंगणा पोलिसांनी ही दुचाकी पकडून दंड ठोठावल्याचा संदेश १६ एप्रिल रोजी जावयाच्या मोबाईलवर आला. यामुळे दोघेही तेलंगणात असल्याची शक्यता व्यक्त केली जात असून पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे संबंधित कुटुंबाला मोठा मानसिक धक्का बसला असून परिसरातही चर्चांना उधाण आले आहे.
दरम्यान, बीड जिल्ह्यातच आणखी एक गंभीर घटना घडली आहे. परळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती तथा गोवर्धन गावचे माजी सरपंच संजय देशमुख यांच्यावर रविवारी रात्री अज्ञात हल्लेखोरांनी प्राणघातक हल्ला केला. देशमुख हे गोवर्धनहून सिरसाळ्याकडे जात असताना दोन दुचाकींवरून आलेल्या सहा हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला चढवला.
या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. हल्ल्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून परळी पोलिस पुढील तपास करत आहेत.



