मुंबई : प्रतिनिधी
राज्यात सध्या हवामानाचा विलक्षण आणि चिंताजनक बदल पाहायला मिळत असून उष्णतेचा प्रचंड कहर आणि अवकाळी पावसाचा तडाखा अशा दुहेरी संकटाचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. एका बाजूला तापमानाचा पारा ४० अंशांच्या पुढे झेपावत आहे, तर दुसऱ्या बाजूला काही भागांत अचानक पावसाच्या सरी कोसळत असल्याने शेतकरी वर्ग मोठ्या अडचणीत सापडला आहे.
विदर्भात उष्णतेने विक्रमी पातळी गाठली असून अकोला येथे ४४.१ अंश, वर्धा ४४.४, नागपूर ४४, गडचिरोली ४४ आणि अमरावतीतही ४४ अंशांच्या आसपास तापमान नोंदवले गेले आहे. चंद्रपूरमध्ये ४३.६, यवतमाळ ४२.८, गोंदिया ४२.९ आणि भंडारा ४२ अंशांवर पोहोचले आहे. या तीव्र उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले असून उष्माघाताचा धोका वाढला आहे.
राज्यातील इतर भागांतही उकाडा वाढला आहे. सांगली ४१.५, जळगाव ४२.३, परभणी ४१.८, सातारा ४०.८, पुणे ४०.३ आणि छत्रपती संभाजीनगर ४१.६ अंशांवर पोहोचले आहे. नाशिक, ठाणे आणि माथेरान येथे तुलनेने कमी तापमान असले तरी उष्णतेचा परिणाम जनजीवनावर जाणवत आहे. दुपारच्या वेळेत नागरिक घराबाहेर पडणे टाळत आहेत.
दरम्यान, उष्णतेच्या लाटेसोबतच काही भागांत अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. सोलापूर जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. मोहोळ आणि उत्तर सोलापूर तालुक्यात सुमारे एक तास पावसाची नोंद झाली. या पावसामुळे काही प्रमाणात उकाड्यापासून दिलासा मिळाला असला तरी शेती पिकांसाठी हा पाऊस धोकादायक ठरत आहे.
या दरम्यान मोहोळ तालुक्यातील आढेगाव येथे वीज कोसळून विजय राजाराम डोंगरे या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. अचानक बदललेल्या हवामानामुळे ही घटना घडली असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातही तापमान ४१ अंशांवर पोहोचले असून उष्णतेचा परिणाम शिर्डीतील साईबाबा मंदिर परिसरावरही दिसून येत आहे. भाविकांची संख्या घटली असून संस्थानतर्फे मंडप, गालिचे व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यांसाठी पुढील २४ तासांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच १९ आणि २० एप्रिल दरम्यान राज्यातील अनेक जिल्ह्यांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असून वाऱ्याचा वेग ताशी ३० ते ४० किलोमीटरपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. या बदलत्या हवामानामागे मध्य प्रदेशच्या ईशान्य भागात निर्माण झालेली चक्राकार वाऱ्यांची स्थिती कारणीभूत असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. हे वारे मराठवाडा, विदर्भ आणि कर्नाटक सीमेलगत सक्रिय झाल्याने पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे.
दरम्यान, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड तसेच पुणे, सातारा, बुलढाणा, अकोला, अमरावती, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनीही पिकांचे नुकसान टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. एकूणच, राज्यात उष्णतेचा तडाखा आणि अवकाळी पावसाचा अनिश्चितपणा यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून शेतकरी आणि नागरिक दोघेही मोठ्या चिंतेत सापडले आहेत.



