जळगाव : प्रतिनिधी
मुंबईतील एका प्रौढ महिलेला ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली धमकावून तब्बल ६५ लाख रुपये उकळल्याच्या गंभीर सायबर फसवणूक प्रकरणात मुंबई सायबर क्राईम शाखेने मोठी कारवाई केली आहे. मुंबई पोलिसांच्या सायबर क्राइमच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक पुनम जाधव यांच्या पथकाने नशिराबाद येथे येऊन स्थानिक पोलिसांच्या मदतीने चार आरोपींना अटक केली.
या प्रकरणातील मुख्य आरोपी जयेश काळे (वय २६, रा. तरसोद, जि. जळगाव) याचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने आपल्या साथीदारांसह हा गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यानुसार संकेत सोपान महाजन (वय २८, रा. मेहरुण, जळगाव) आणि यशवंत शालिक धांडे (वय २९, रा. मेहरुण, जळगाव) यांना एमआयडीसी पोलिसांच्या मदतीने त्यांच्या राहत्या घरातून अटक करण्यात आली. तपासादरम्यान आरोपींनी कबूल केले की, मुख्य सूत्रधाराच्या सांगण्यावरून त्यांनी मुंबईतील फिर्यादी महिलेच्या घरी जाऊन सुमारे २५ लाख रुपये रोख स्वरूपात घेतले व ती रक्कम जळगाव येथे आणून विनोद प्रकाश अत्तरदे (वय ३८, रा. खेडी, जळगाव) याच्या ताब्यात दिली. त्यानंतर विनोद अत्तरदे यालाही स्थानिक पोलिसांच्या मदतीने अटक करण्यात आली.
पोलिसांनी आरोपींकडून सुमारे २५ लाख रुपये रोख रक्कम जप्त केली असून उर्वरित रक्कम इतर मार्गाने विल्हेवाट लावल्याची माहिती समोर आली आहे. तसेच मुख्य आरोपी जयेश काळे याच्याकडून दीड लाख रुपये रोख व अंदाजे पाच तोळे सोने जप्त करण्यात आले आहे.
प्राथमिक तपासात, जयेश काळे हा यापूर्वी कंबोडिया देशात नोकरी करत असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात सर्व आरोपींनी संगनमताने “डिजिटल अरेस्ट’चा बनाव करून संबंधित महिलेला घाबरवून मोठी रक्कम उकळल्याचे निष्पन्न झाले आहे. अटक केलेल्या आरोपींना पुढील तपासासाठी मुंबई येथील सायबर पोलीस ठाणे (पश्चिम विभाग, बांद्रा) येथे नेण्यात आले असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पूनम जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. या प्रकरणात आणखी काही व्यक्तींचा सहभाग असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली असून त्या दृष्टीने तपास सुरू आहे. आर्थिक व्यवहारांची साखळी, संपर्क आणि इतर डिजिटल पुरावे तपासून या रॅकेटमधील इतर संशयितांचा शोध घेतला जात आहे.
दरम्यान, “डिजिटल अरेस्ट’ ‘सारख्या सायबर फसवणुकीच्या घटना आता ग्रामीण भागातही पोहोचत असल्याचे या प्रकरणातून स्पष्ट झाले आहे. खानदेशातील जळगावपर्यंत या गुन्ह्याचे जाळे पोहोचल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. नागरिकांनी अशा प्रकारच्या फोन कॉल्स, धमक्या किंवा ऑनलाईन व्यवहारांबाबत सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.



