भुसावळ : प्रतिनिधी
मध्य प्रदेशातील खंडवा जिल्ह्यातील बोरगाव परिसरात शुक्रवारी पहाटे सुमारे ५ वाजता झालेल्या भीषण कार अपघातात भुसावळ तालुक्यातील वरणगाव फॅक्टरी परिसरातील एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, चार जण गंभीर जखमी झाले आहेत. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण वरणगाव आणि दर्यापूर शिवार परिसरात शोककळा पसरली आहे. या अपघातात श्याम विक्रम ठाकूर (वय ४५), शोभा विक्रम ठाकूर (वय ६०) आणि अवघ्या ५ वर्षीय शिवन्या श्याम ठाकूर यांचा मृत्यू झाला आहे. एकाच कुटुंबातील तीन सदस्यांचा मृत्यू झाल्याने परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ठाकूर कुटुंबीय उज्जैन, ओंकारेश्वर आणि सिहोर येथे धार्मिक दर्शनासाठी गेले होते. दर्शन पूर्ण करून ते आपल्या मूळ गावी परत येत असताना हा भीषण अपघात घडला. प्रवासादरम्यान पहाटेच्या सुमारास वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार रस्त्यावर पलटी झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. मात्र अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. अपघाताची माहिती मिळताच मध्य प्रदेशातील स्थानिक पोलिस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह ताब्यात घेऊन वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये शवविच्छेदन करण्यात आले आहे. अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, सलग घडणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर रस्ते सुरक्षा आणि प्रवासादरम्यान काळजी घेण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे. दर्यापूर शिवारातील गणेश नगर आणि वरणगाव फॅक्टरी परिसरात या घटनेची माहिती पोहोचताच शोककळा पसरली. ठाकूर कुटुंबाच्या घरी नातेवाईक आणि शेजाऱ्यांची मोठी गर्दी झाली असून आक्रोशाचे दृश्य पाहायला मिळत आहे. अचानक घडलेल्या या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
अपघातात कारचालक श्याम ठाकूर यांचा जागीच मृत्यू झाला. तर गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या शोभाबाई ठाकूर यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. लहानगी शिवन्या हिला बऱ्हाणपूर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते, परंतु उपचार सुरू असताना तिचाही दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातात चार भाविक जखमी झाले असून त्यांच्यावर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे.



