मुंबई : वृत्तसंस्था
अमरावती जिल्ह्यातील परतवाडा परिसरात उघडकीस आलेल्या तरुणींच्या शोषण आणि व्हिडिओ व्हायरल प्रकरणामुळे राज्यभरात संतापाची तीव्र लाट उसळली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी अयान अहमद याने पोलिस चौकशीत केलेले खुलासे अधिकच धक्कादायक ठरत असून, या गुन्ह्याच्या मागील मानसिकता आणि कार्यपद्धती उघड झाली आहे.
चौकशीदरम्यान अयानने पहिल्या ब्रेकअपनंतर आपण “प्लेबॉय” बनल्याचे सांगितले असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मते, हा प्रकार कोणत्याही मानसिक आजारातून नव्हे, तर चुकीच्या जीवनशैलीतून आणि विकृत विचारसरणीतून घडलेला आहे.
तपासात असे उघड झाले आहे की, अयान अहमद सोशल मीडियावर, विशेषतः इन्स्टाग्रामवर अत्यंत सक्रिय होता. त्याचे तब्बल १८ हजारांहून अधिक फॉलोअर्स होते. तो स्वतःला इन्फ्लुएन्सर म्हणून सादर करत पेड प्रमोशनच्या माध्यमातून पैसे कमवत होता. याशिवाय मोबाईल विक्रीचा व्यवसायही तो करत होता. मात्र, महागडी जीवनशैली आणि मुलींवर खर्च करण्याची सवय यामुळे तो सतत कर्ज घेत असल्याचेही समोर आले आहे.
अयानने सोशल मीडिया प्रोफाइलचा वापर करून तरुणींना जाळ्यात ओढण्याची पद्धत अवलंबली होती. सुरुवातीला तो मैत्री करून चार ते पाच महिने सातत्याने संवाद साधत मुलींचा विश्वास संपादन करत असे. विश्वास बसल्यानंतर तो शरीरसुखाची मागणी करत असे किंवा दबाव टाकून संबंध ठेवण्यास भाग पाडत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या पद्धतीने अनेक तरुणी त्याच्या जाळ्यात अडकल्या असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, या प्रकरणात आणखी एक महत्त्वाची बाब समोर आली आहे. अयान अहमद हा एमआयएम पक्षाच्या अमरावती युनिटचे सोशल मीडिया हँडलही सांभाळत होता. मात्र, त्याचे नाव या गंभीर गुन्ह्यात समोर आल्यानंतर संबंधित पक्षाने त्याला तातडीने पदावरून हटवले असल्याचे समजते. या निर्णयामुळे प्रकरणाची गंभीरता अधोरेखित झाली आहे.
सध्या पोलिस अयानच्या मोबाईलमधील डेटा, चॅट्स आणि इतर डिजिटल पुरावे तपासत आहेत. या तपासातून आणखी पीडित तरुणींची माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच या गुन्ह्यामागे इतर कोणाचा सहभाग आहे का, याचाही शोध घेतला जात आहे. अयानच्या आलिशान जीवनशैलीमागील आर्थिक स्रोतांचाही तपास सुरू आहे.
दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणातील पीडितांना पुढे येण्याचे आवाहन केले आहे. कोणत्याही दबावाला बळी न पडता सत्य मांडावे, असे आवाहन करण्यात आले आहे. सोशल मीडियाच्या आडून वाढणाऱ्या अशा गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे समाजासमोर गंभीर प्रश्न निर्माण झाले असून, या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. आरोपींवर कठोर कारवाई करण्यासाठी पोलिस यंत्रणा प्रयत्नशील आहे.



