जळगाव : प्रतिनिधी
शहरातील एका महिला ग्राफिक डिझायनरची अघोरी विद्या आणि गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांत फसवणूक झाल्याच्या प्रकाराला चार वर्षे उलटून गेले असले तरी, या गुन्ह्यातील दांपत्याला पोलिस पकडू शकलेले नाहीत. यातील, मुख्य संशयिताची पत्नी स्वतः पोलिस कर्मचारी असल्याने या तपासात दिरंगाई होत असल्याचा आरोप करीत संतप्त पीडितेने १६ एप्रिलला अखेर पोलिस अधीक्षकांकडे धाव घेत न्यायाची मागणी केली.
पीडित महिला आणि संशयित पोलिस कर्मचारी महिमा पाटील या कॉलेजपासूनच्या मैत्रिणी होत्या. पीडितेच्या घरातील वादाचा गैरफायदा घेत महिमाने तिचा पती ललित पाटील याच्याकडे ‘दैवी शक्ती’ असल्याचे सांगितले. घरातील संकटे दूर करण्याचे आश्वासन देत पीडितेचा विश्वास संपादन केला आणि तिला अघोरी विद्येच्या जाळ्यात ओढल्याची तक्रार आहे. भोंदू ललित पाटील याने पीडितेच्या मनात भीती निर्माण करून तिला उज्जैन, तनोट माता मंदिर आणि ओंकारेश्वर अशा ठिकाणी नेले. उज्जैन येथे स्मशानभूमीत अघोरी पूजा करून लाखो रुपये उकळले. पीडितेने कर्ज काढून दिलेले सुमारे ११ लाख रुपये परत मागितले असता, संशयिताने तिला कुटुंबाचा नाश करण्याची धमकी दिली. याप्रकरणी २०२२ मध्ये गुन्हा दाखल झाला असला तरी फसवणुकीचा हा प्रकार गेल्या चार वर्षांपासून सुरू आहे. संशयित महिला पोलिस कर्मचारी मुंबईत कार्यरत असूनही तिला अटक न झाल्याने ‘खाकी’च संशयितांना पाठीशी घालत असल्याचा आरोप पीडितेने केला आहे. जळगाव पोलिसांनी अनेकदा मुंबई व ठाणे येथे छापे टाकले. मात्र, अद्यापही हे भोंदू दांपत्य पोलिसांच्या हाती लागलेले नाही.



