मुंबई : वृत्तसंस्था
दादर परिसरात पूर्ववैमनस्यातून ४० वर्षीय तरुणाची त्याच्या पत्नीसमोरच बेदम मारहाण करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घडलेल्या या घटनेत अंकुश आंबोरकर यांचा मृत्यू झाला असून, गौरव सणस आणि त्याच्या साथीदारांनी हा हल्ला केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. दादर पोलिसांनी याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करत आतापर्यंत सहा आरोपींना अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अंकुश आंबोरकर रविवारी रात्री दादर येथे आपल्या एका मित्राला भेटण्यासाठी गेले होते. यावेळी आरोपी गौरव सणसने त्यांना रस्त्यात अडवले. दोघांमध्ये झालेल्या शाब्दिक वादाचे रूपांतर लवकरच हाणामारीत झाले. गौरवने आपल्या टोळक्यासह अंकुश यांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली.
दरम्यान, अंकुश यांच्या पत्नी प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिरात सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत आहेत. पतीवर हल्ला झाल्याची माहिती मिळताच त्यांनी सहकाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी अंकुश यांना हल्लेखोरांच्या तावडीतून सोडवले; मात्र तोपर्यंत ते गंभीर जखमी झाले होते.
घटनास्थळी गर्दी वाढू लागल्याचे पाहून आरोपी पसार झाले. माहिती मिळताच दादर पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि जखमी अंकुश यांना तातडीने केईएम रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
तपासात समोर आले की, अंकुश आंबोरकर आणि गौरव सणस यांच्यात जुना व्यावसायिक वाद होता. दोघे पूर्वी एकत्र बँजो व्यवसाय करत होते. २०१७ मध्ये भागीदारी तुटल्यानंतर त्यांच्यात तीव्र वितुष्ट निर्माण झाले होते. त्यानंतर गौरवकडून अंकुश यांना वारंवार धमक्या दिल्या जात होत्या. याबाबत यापूर्वीही दादर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली होती.
अनेक वर्षांपासून सुरू असलेले हे वैयक्तिक वैर अखेर हत्येपर्यंत पोहोचल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, उर्वरित आरोपींचा शोध घेतला जात आहे.



