बारामती : वृत्तसंस्था
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असून, करुणा मुंडे शर्मा यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. आमदार धनंजय मुंडे यांना पुन्हा मंत्री करण्यात आले, तर महायुतीची सत्ता कोसळेल आणि तो पक्ष पुन्हा कधीही सत्तेत येणार नाही, असा थेट इशारा त्यांनी दिला.
पत्रकार परिषदेत बोलताना करुणा मुंडे शर्मा म्हणाल्या की, वंजारी समाजाने धनंजय मुंडेंना नाकारले असून, त्यांना पुन्हा मंत्री केल्यास त्याचे राजकीय परिणाम भोगावे लागतील. “हा एका स्त्रीचा शब्द आहे,” असे ठामपणे सांगत त्यांनी तीव्र भूमिका मांडली. तसेच, “धनंजय मुंडेंनी स्वतःच्या पत्नीला तुरुंगात टाकले आणि अनेक लोकांवर गुन्हे दाखल केले. अशा हजारो लोकांची यादी माझ्याकडे आहे,” असा आरोपही त्यांनी केला. जर त्यांना पुन्हा मंत्री केले, तर मंत्रालयासमोर आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला.
यावेळी अजित पवार यांच्या कथित विमान अपघाताच्या मुद्द्यावरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. “अजित पवारांच्या अपघाताबाबत अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. त्यांनाच न्याय मिळत नसेल, तर सामान्यांचे काय?” असा सवाल त्यांनी केला. या मुद्द्यावर लढा देण्यासाठीच आपण बारामतीची पोटनिवडणूक लढवत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यांनी सुनेत्रा पवार यांच्यावरही टीका करत, “त्या स्वतः सत्तेत असूनही एफआयआर दाखल झाला नाही,” असे नमूद केले. निवडणुकीत विजय मिळाल्यास सर्वप्रथम या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
करुणा मुंडे शर्मा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही निशाणा साधला. “हे सरकार केवळ धूर काढणारे इंजिन आहे. लोकांना ईडी, सीडीची भीती दाखवून पक्षात आणले जाते,” असा आरोप त्यांनी केला. सत्ताधारी पक्षाच्या ‘ऑपरेशन टायगर’ मोहिमेवर टीका करत त्या म्हणाल्या, “हे ऑपरेशन टायगर नसून ऑपरेशन मेंढी आहे,” असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला.
दरम्यान, रवींद्र वायकर यांच्यावरील ईडी कारवाईवरही त्यांनी भाष्य केले. “वायकर यांच्या घरी मध्यरात्रीपासून छापे टाकून दबाव टाकण्यात आला. त्यांच्या कुटुंबालाही त्रास देण्यात आला,” असा दावा त्यांनी केला. तसेच, या प्रकरणामागील राजकीय दबावाचा आरोप करत त्यांनी संबंधितांवर कारवाईची मागणी केली.



