बीड : वृत्तसंस्था
जिल्ह्यातील एका गावातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मित्रांसोबत झालेल्या वादानंतर तसेच वाढदिवसाच्या सेलिब्रेशनला न बोलवल्यामुळे नैराश्यातून एका 24 वर्षीय तरुणाने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने ‘माझे दुःख कोणाला सांगू, मी एकटा पडलो’ असे स्टेटस ठेवले होते. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील कुंबेफळ येथील हा तरुण असून त्याचे नाव महेश उद्धव भणगे असे आहे. त्याने राहत्या घरीच विष प्राशन करून हे टोकाचे पाऊल उचलले आहे. जवळच्या मित्राच्या वाढदिवसाला न बोलावल्याने महेश काही दिवसांपासून प्रचंड नैराश्यात होता आणि यातूनच त्याने हे कृत्य केल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महेशने पाणी पिण्याच्या तांब्यात विषारी द्रव्य मिसळून प्राशन केले. दुपारच्या वेळी तो एकटाच घरच्या छतावर गेला होता. मात्र, बऱ्याच वेळ झाला तरी तो खाली न आल्याने रात्री 8 च्या सुमारास त्याचे कुटुंबीय त्याला पाहण्यासाठी छतावर गेले. त्यावेळी तो बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. त्याला तातडीने अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
महेशने आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या मोबाइलवरून स्टेटस ठेवले होते. त्याने असे लिहिले होते की, ‘माझे दुःख कोणाला सांगू, मी एकटा पडलो’, असे भावनिक स्टेटस त्याने ठेवले होते. दरम्यान, गेल्या सोमवारी (दि. 6 एप्रिल) त्याच्या एका मित्राचा वाढदिवस होता. मेशला यावेळी मित्रांनी बोलावले नाही. त्याला सोडूनच इतर मित्रांनी सेलिब्रेशन केले. या घटनेमुळे महेशला फार वाईट वाटले व यातून तो प्रचंड नैराश्यात गेला व यातून त्याने टोकाचे पाऊल उचलले. या घटनेमुळे कुंबेफळ गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. तसेच अंबाजोगाई ग्रामीण पोलिस घटनेचा तपास करत आहेत.



