बारामती : वृत्तसंस्था
अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत सुरुवातीला बिनविरोध निवडणुकीची शक्यता वर्तवली जात होती. महायुतीकडून सुनेत्रा पवार यांना सहानुभूतीची लाट मिळेल आणि निवडणूक एकतर्फी होईल, असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र, प्रत्यक्षात हा अंदाज पूर्णपणे चुकीचा ठरला असून तब्बल ५५ उमेदवारांनी निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतल्याने ही लढत आता अत्यंत चुरशीची आणि रंजक बनली आहे.
काँग्रेसने आकाश मोरे यांना उमेदवारी देत धनगर समाजाचे प्रतिनिधित्व पुढे केल्याने निवडणुकीचे समीकरण अधिक गुंतागुंतीचे झाले आहे. या जातीय समीकरणामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनेत्रा पवार यांच्यासमोरचे आव्हान वाढले असून, ही निवडणूक अपेक्षेपेक्षा अधिक कठीण बनत चालली आहे.
दरम्यान, बदलत्या राजकीय परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी राज्यसभा खासदार पार्थ पवार देखील उपस्थित होते. या बैठकीत भाजप ‘मोठा भाऊ’ म्हणून पूर्ण ताकदीने त्यांच्या पाठीशी उभा राहील, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केल्याची माहिती समोर येत आहे. सुनेत्रा पवार यांच्या विजयासाठी आवश्यक ती सर्व मदत करण्याची ग्वाहीही त्यांनी दिली.
या पोटनिवडणुकीसाठी २३ एप्रिल रोजी मतदान होणार असून ४ मे रोजी निकाल जाहीर केला जाणार आहे. विशेष म्हणजे, करुणा मुंडे आणि अभिजित बिचुकले यांच्यासह एकूण ५५ उमेदवार मैदानात उतरल्याने निवडणूक अधिकच रंगतदार होणार आहे.
दरम्यान, काँग्रेसने स्वतंत्र उमेदवार दिल्यामुळे पार्थ पवार यांनी तीव्र प्रतिक्रिया देत काँग्रेसचा ‘डाऊनफॉल’ सुरू झाल्याचे वक्तव्य केले आहे. त्यांच्या या टीकेला काँग्रेस नेत्यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिल्याने दोन्ही बाजूंमध्ये शाब्दिक चकमक रंगली आहे. परिणामी, बारामतीतील राजकीय वातावरण तापले असून महायुती आणि काँग्रेस यांच्यातील संघर्ष अधिकच तीव्र होताना दिसत आहे.



