जळगाव : प्रतिनिधी
राज्यातील प्रशासकीय यंत्रणेत मोठ्या प्रमाणावर फेरबदल करत शासनाने आज ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले. या बदल्यांमध्ये जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल यांची मुंबई येथे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोखरा) प्रकल्प संचालकपदी बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी नाशिक महानगरपालिकेच्या अप्पर आयुक्त करिष्मा नायर या नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून लवकरच पदभार स्वीकारणार आहेत.
मिनल करणवाल यांनी जळगाव जिल्हा परिषदेच्या सीईओ म्हणून काम करताना विविध विकासकामांना गती दिली होती. मार्च २०२५ मध्ये त्यांनी नांदेड जिल्हा परिषदेतून बदली होऊन जळगाव येथे पदभार स्वीकारला होता. त्यांच्या कार्यकाळात ग्रामीण विकास, पाणीपुरवठा आणि शिक्षण क्षेत्रात काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या बदलीबाबत चर्चा सुरू होती, त्याला आज अधिकृत दुजोरा मिळाला.
दरम्यान, करिष्मा नायर या २०२१ बॅचच्या आयएएस अधिकारी असून त्या गेल्या वर्षापासून नाशिक महानगरपालिकेत अप्पर आयुक्त म्हणून कार्यरत होत्या. फॉरेन्सिक सायन्स विषयात पदवीधर असलेल्या नायर यांनी आपल्या कार्यकाळात प्रशासनात प्रभावी कामगिरी बजावली आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे जळगाव जिल्हा परिषदेला नव्या नेतृत्वाची दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. या बदल्यांमुळे राज्यातील प्रशासकीय कामकाजात नवचैतन्य येईल, असा विश्वास व्यक्त केला जात असून आगामी काळात या अधिकाऱ्यांकडून प्रभावी कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



