मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात एलपीजी सिलिंडर टंचाईच्या मुद्द्यावरून सत्ताधारी सरकारमध्येच मतभेद उघड होत असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. मंत्रिमंडळातील मंत्री एकमेकांना पत्र लिहित असल्याची बाब गंभीर असल्याचे सांगत त्यांनी सरकारच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी गॅस सिलिंडर्ससंदर्भात पत्र लिहून सामान्यांचा प्रश्न ऐरणीवर आणल्याबद्दल सुळे यांनी त्यांचे आभार मानले. मात्र, “आता मुख्यमंत्री यांनी केंद्र सरकारशी चर्चा करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी,” अशी मागणी त्यांनी केली. एलपीजीसारख्या महत्त्वाच्या विषयावर सरकारमध्ये समन्वयाचा अभाव असल्याचे त्यांनी सूचित केले.
जागतिक पातळीवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर बोलताना सुळे म्हणाल्या की, देशावर संकट आले तर विरोधक म्हणून आम्ही सरकारसोबत ठामपणे उभे राहू. त्यांनी अमित शाह आणि राजनाथ सिंह यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीतही सहकार्याची भूमिका मांडल्याचे सांगितले. “देशहिताच्या प्रश्नांवर राजकीय मतभेद बाजूला ठेवणे आवश्यक आहे. मात्र अशा संवेदनशील मुद्द्यांवर सरकारने पारदर्शक भूमिका घेणे गरजेचे आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले. एलपीजीच्या दरवाढीपासून ते पुरवठ्यापर्यंत सर्व बाबींवर सरकारने स्पष्ट भूमिका मांडावी, अशी मागणी सुळे यांनी केली. “नागरिकांपुढे खरी परिस्थिती मांडली पाहिजे,” असे त्या म्हणाल्या.
राजकीय घडामोडींवर भाष्य करताना सुळे यांनी विरोधकांविषयी संतुलित भूमिका मांडली. आदित्य ठाकरे आणि मोहीत कंबोज यांच्या भेटीबाबत विचारले असता, “तो त्यांचा वैयक्तिक विषय आहे. लोकशाहीत कोण कोणाला भेटायचे हा प्रत्येकाचा अधिकार आहे,” असे त्यांनी सांगितले. त्या पुढे म्हणाल्या, “राजकारण आणि सामाजिक संबंध वेगळे असतात. आम्ही कधीच विरोधकांना शत्रू मानले नाही. मतभेद असले तरी मनभेद होऊ नयेत, हीच खरी लोकशाही संस्कृती आहे.”



