चोपडा : प्रतिनिधी
तालुक्यात अमली पदार्थांविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई करत गांजाची तस्करी करणाऱ्या तिघांना रंगेहाथ अटक केली आहे. या कारवाईत तब्बल २ लाख ९१ हजार रुपये किंमतीचा १३ किलो २५४ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वैजापूर ते चोपडा जाणाऱ्या रस्त्यावर बोर अजंटी शिवारात बापु नरसिंग बारेला यांच्या शेताजवळ संशयास्पद हालचाली सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचत कारवाई केली. या वेळी इम्रान रहेमान पठाण (वय २१), रहेमान निहामत पठाण (वय ५९) आणि अतिक रफिक शेख (वय ४५) हे तिघे गांजाची तस्करी करताना पोलिसांच्या तावडीत सापडले. तिन्ही आरोपी हे परतूर तालुक्यातील सातोना खुर्द येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे.
झडतीदरम्यान आरोपींकडून १३ किलो २५४ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला असून त्याची बाजारभावानुसार किंमत २ लाख ९१ हजार रुपये इतकी आहे. या प्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून अमली पदार्थांच्या विरोधात पोलिसांनी घेतलेली ही मोठी यशस्वी कारवाई मानली जात आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश टाक करत आहेत.



