चाळीसगाव : प्रतिनिधी
शहरातील घाटरोड परिसरात जुन्या वादातून तरुणावर लोखंडी रॉड व लाकडी बांबूने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, जहागीरदार वाडी येथील रेहान खान मंजूर खान (वय १९) या तरुणाने या संदर्भात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, १५ फेब्रुवारीला दुपारी सुमारे १२.४० वाजता रेहान खान हा घाटरोड पोलीस चौकीच्या पाठीमागील गल्लीतून जात असताना जुन्या वादावरून मुफीद रेहमान मुजावर याने लोखंडी रॉडने तर मोहसीन मुजावर याने बांबूने त्याच्यावर पाठीवर, पायावर व डोक्यावर मारहाण केली. या हल्ल्यात रेहान खान याच्या उजव्या हाताचे हाड फॅक्चर झाले आहे.
दरम्यान, रेहानच्या वडिलांनाही मुफीद मुजावर, मुजीब रेहमान मुजावर व सोहेल शफी शेख यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. घटनेनंतर रेहान खान बेशुद्ध पडल्याने मजहर खान मन्सूर खान व हसन खान मेहमुद खान यांनी त्याला खासगी वाहनातून धुळे जिल्हा रुग्णालयात दाखल केले. उपचारानंतर पीडित तरुणाने चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर मुफीद रेहमान मुजावर, मोहसीन मुजावर, मुजीब रेहमान मुजावर व सोहेल शफी शेख (सर्व रा. बाराभाई मोहल्ला, चाळीसगाव) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



