यवतमाळ : वृत्तसंस्था
राज्यात अपघातांची मालिका सुरू असतानाच गुरुवारी दिग्रस तालुक्यातील साखरा गावाजवळ भीषण अपघात घडला. संजय देशमुख (शिवसेना ठाकरे गट) यांच्या वाहनाला एका भरधाव ट्रकने जोरदार धडक दिल्याने त्यांच्या कारचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने खासदार देशमुख या अपघातातून थोडक्यात बचावले असून त्यांच्या प्रकृतीला धोका नसल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खासदार देशमुख हे एका कार्यक्रमातून परतत असताना साखरा गावाजवळ हा अपघात झाला. ट्रकने त्यांच्या कारला जोरदार धडक दिल्याने वाहनाचे पुढील बाजूस मोठे नुकसान झाले. अपघाताची बातमी समजताच परिसरात खळबळ उडाली.
घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. काही काळ रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. पोलिसांनी त्वरित हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली व वाहतूक सुरळीत केली.
अपघातानंतर खासदार देशमुख यांनी दिग्रस येथील खासगी रुग्णालयात जाऊन तपासणी व उपचार घेतले. त्यांना किरकोळ दुखापत झाली असून ते सुखरूप असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. या अपघातात अन्य कोणी जखमी झाले आहे का, याबाबतचा तपशील पोलिसांकडून संकलित केला जात आहे.



