सातारा : वृत्तसंस्था
सातारा-मेढा रस्त्यावरील करंजे नाका येथे बुधवारी सायंकाळी एका तरुणावर धारदार कोयत्याने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. अक्षय रामदास गाडे (रा. सातारा) याच्यावर अज्ञात कारणावरून वार करण्यात आले असून या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सायंकाळच्या सुमारास करंजे नाका परिसरात अक्षय गाडे उभे असताना संशयित हल्लेखोराने अचानक कोयत्याने वार केले. या हल्ल्यात गाडे गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. हल्ल्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनेनंतर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने जमा झाले. काही संतप्त नागरिकांनी हल्लेखोराला पकडून मारहाण करण्याचा प्रयत्न केला. परिस्थिती चिघळण्याची चिन्हे दिसताच शाहूपुरी पोलिस स्टेशन येथील पोलिस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले.
पोलिसांनी जमावाच्या तावडीतून हल्लेखोराची सुटका करत त्याला ताब्यात घेतले. यावेळी पोलिस निरीक्षक सचिन मेह्त्रे घटनास्थळी उपस्थित होते. काही नागरिकांनी पोलिसांशी हुज्जत घालण्याचाही प्रयत्न केल्याची माहिती मिळाली. मात्र पोलिसांनी संयम राखत परिस्थिती नियंत्रणात आणली. या प्रकरणी शाहूपुरी पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. हल्ल्यामागील नेमके कारण काय, पूर्ववैमनस्य होते का, याचा शोध पोलिस घेत आहेत. दरम्यान, या घटनेमुळे करंजे नाका परिसरात काही काळ भीती आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी अतिरिक्त बंदोबस्त तैनात करून परिस्थिती पूर्णतः नियंत्रणात आणली आहे.



