जळगाव : प्रतिनिधी
शहरातील नवीपेठ परिसरात भरदिवसा धाडसी चोरीची घटना घडली असून, बँकेतून काढलेले तब्बल १० लाख रुपयांपैकी ८ लाख रुपये अज्ञात चोरट्यांनी लंपास केले. ही घटना बुधवारी (२५ रोजी) दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास जुन्या बसस्थानकासमोरील गल्लीत घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, मजुरांना वेतन देण्यासाठी मक्तेदार मयुर रवींद्र चौधरी यांनी त्यांचे सुपरवायझर प्रेम महारू जाधव यांना बँकेतून १० लाख रुपये काढण्यास सांगितले होते. जाधव यांनी रक्कम काढून ती दुचाकीच्या डिक्कीत ठेवली आणि निघाले. मात्र काही अंतरावरच दुचाकी पंक्चर झाली. त्यामुळे त्यांनी जवळील पंक्चर दुकानासमोर गाडी लावली. पंक्चर काढण्याचे काम सुरू असताना जाधव समोरील नाश्त्याच्या दुकानात गेले. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी दुचाकीच्या डिक्कीतून ८ लाख रुपये चोरून नेले. सुदैवाने डिक्कीत ठेवलेले उर्वरित २ लाख रुपये सुरक्षित राहिले.
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन गणापुरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, शहर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सागर शिंपी तसेच एलसीबीचे उपनिरीक्षक शरद बागल यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता चार जण दुचाकीवरून संशयास्पदरीत्या फिरताना दिसून आले आहेत.
या प्रकरणी प्रेम जाधव यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस पुढील तपास करत आहेत. ही घटना लक्षात येताच परिसरात खळबळ उडाली असून भरदिवसा झालेल्या या धाडसी चोरीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.



