जळगाव : प्रतिनिधी
वाजंत्री वाजविण्याची निर्धारित वेळ संपल्याने बँड बंद केल्यानंतर पुन्हा सुरू करण्यास नकार दिल्याच्या कारणावरून बँडमालकावर धारदार वस्तूने हल्ला केल्याची गंभीर घटना २१ फेब्रुवारी रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास मेहरुण परिसरातील रामनगर भागात घडली. या प्रकरणी नवरदेवासह दोन ते तीन जणांविरुद्ध २२ फेब्रुवारी रोजी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अमोल लक्ष्मीकांत पवार (वय २६, रा. शिरसोली प्र.बो., ता. जळगाव) हे बँड व्यवसाय करतात. मेहरुण परिसरातील रामनगर भागात शंकर अशोक काळे यांच्या हळदीच्या कार्यक्रमासाठी त्यांनी वाजंत्री लावली होती. रात्री १० वाजल्यानंतर नियमानुसार वाजंत्री बंद करण्यात आली. यावेळी नवरदेव शंकर काळे याच्यासह दोन ते तीन जणांनी “आम्हाला नाचायचे आहे, बँड पुन्हा सुरू करा,” अशी मागणी केली. मात्र वेळ संपल्याचे सांगत अमोल पवार यांनी बँड सुरू करण्यास नकार दिला. याचा राग आल्याने संबंधितांनी त्यांच्याशी वाद घालत शिवीगाळ केली.
वाद वाढत असताना त्यातील एका व्यक्तीने धारदार वस्तूने अमोल पवार यांच्या डोक्यावर वार करून त्यांना जखमी केले. तसेच “बँड वाजविला नाही तर तुला सोडणार नाही,” अशी धमकीही दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या घटनेनंतर जखमी अमोल पवार यांच्यावर उपचार करण्यात आले. प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात नवरदेवासह दोन ते तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.



